

Heavy rains in eight mandals of Gangakhed and Palam, disrupting normal life
परभणी, पुढारी वृत्तसेवा शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले. गंगाखेड आणि पालम तालुक्यातील आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी सकाळी १०:३० पर्यंत जिल्ह्यात ३१.३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात बुधवार पासून संततधार पाऊस सुरू असून यामुळे जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गोदावरी नदीसह जिल्हाभरातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे गंगाखेड तालुक्यातील महातपुरी (७७ मि.मि.), राणीसावरगाव (८४.८ मि.मि.), पिंपळदरी (८६.५ मि.मि.), पुर्णा तालुक्यातील कावलगाव (६९.५ मि.मि.), पालम (७० मि.मि.), चाटोरी (८४.८ मि.मि.), बनवस (८४.८ मि.मि.), पेठशिवणी (८३.३ मि.मि.) या आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात येलदरी धरणातून ४२१९, सिद्धेश्वर धरण ११५१२, लोअर दुधना २०१७, ढालेगाव उच्च पातळी बंधारा ४५१९७, तारुगव्हाण उच्च पातळी बंधारा ४२१९५, मुदगल उच्च पातळी बंधारा ४५१९७, मुळी ५३२४७, डिग्रस उच्च पातळी बंधारा ५७६२६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पालम : तालुक्यात साधारणतः ३६ तासांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. पुयनी आडगाव, खडी, पेंडू खुर्द, पेंडू बु, सेलू, खोरस, तेलजापूर, कोलवाडी, या रस्त्यावरील दहा गावांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लेंडी नदीवरील पूल वाहन गेल्याने सदरील गावातील नागरिकांना आरोग्य से वेसाठी कुठलाच पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, दोन दिवसांपासून जिल्हा परिषद व कुठल्याही संस्थेला कर्मचारी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी पर्याय मार्ग नसल्याने शाळेत बंद अवस्थेतच आढळून येत आहेत.
दिवस आणि रात्र सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आता तोंडाशी आ-लेली पिके कापूस सोयाबीन, तूर, मूग, मुगाला मोड फुटून मूग, सोयाबीन पूर्णस्त वाया जाऊन पिके पाण्याखाली गेले आहेत. शेतीचे बांधद 'खील फुटले असुन पेंडू गावातील पूल पाण्याखाली गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. पेंडू नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पालम शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा नाले तुडुंब भरले असुन पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात होत असल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. मौजे बनवस येथे गावालगत असलेला मुख्य रस्त्यावरील पुलावर काही नागरिक अडकले होते. त्यांना मदत करणाऱ्या छोट्या मुलाचा पाय घसरून तो वाहत असताना अन्य नागरिकांनी धावून जात त्याचा जीव वाचवला. या पावसामुळे तालुक्यातील बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेताला शेततळ्याचे रूप आल्याचे चित्र दिसून आले.