

Hadgaon Municipality election campaign underway
हदगाव, पुढारी वृत्तसेवा : नगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. यंदा उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ सहा दिवसांचा जाहीर प्रचार कालावधी मिळणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची चांगलीच धावपळ सुरू झाल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीसाठी २३ दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम १० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. १० नोव्हेंबरला नामांकन पत्र दाखल झाल्यानंतर अर्जाची छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर २६ नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून त्याच दिवशी चिन्ह वाटप विविध पक्ष-अपक्षांना केली जाईल.
चिन्ह वाटपानंतर २६ ते ३० नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर प्रचाराची मुभा देण्यात आली आहे. एवढ्या मर्यादित वेळेत प्रत्येक वार्डातील मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना जनसंपर्क, घर-घर भेटी, सोशल मीडियाचा वापर, प्रचार साहित्य यावर अधिक भर द्यावा लागणार आहे.
राजकीय पक्षांसाठी मोठी परीक्षा
हदगाव नगरपालिकेचा निवडणूक कल राजकीय पक्षासाठी पहिली मोठी परिक्षा ठरणार आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि नागरी सुविधा या स्थानिक प्रश्नांवर प्रचाराची दिशा फिरणार, असे दिसते. मतदारही बदलाच्या आशेने सर्व घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे सहा दिवसांच्या प्रचार युद्धात कोण मतदारांचे मन जिंकणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.