

Gold investors regret
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: सोने लाखमोलाचे झाले असून गुरुवारी (दि. १९) सोन्याचे भाव १ लाख १ हजार ९९२ होते. सोन्याची ही दरवाढ लहरी ट्रम्पच्या ट्रेड वॉरच्या धमक्यांना घाबरुन गडबडीने सोने विकणाऱ्यांच्या पश्चातापास कारणीभूत ठरली आहे. दरम्यान, लग्नसराई संपताना झालेली ही दरवाढ सराफा बाजारात सन्नाटा पसरवून गेली. दरम्यान, कच्च्या व्यवहारात सोने अद्याप लाखाच्या उंबरठ्यावर आहे.
यापूर्वी गतवर्षी साधारण याच दिवसांत सोन्याने लाखाचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी १ लाख ३ हजार भाव होता. परंतु नंतर तो घसरत गेला आणि नव्वदीत आला. यानंतर अमेरिकेत सत्ताबदल होऊन ट्रम्प सरकार आले. डोनाल्ड ट्रमच्या लहरीपणाने कळस गाठला. मागील महिन्यात त्यांनी अगोदर ट्रेड वॉरची धमकी दिली.
नंतर आपलाच निर्णय फिरवत वाढीव टेरीफला ३ महिने मुदतवाढ दिली. जागतिक सराफा बाजारातील तज्ज्ञ सोन्याचे भाव न भूतो.... कमी होऊन ते ५० ते ६० हजार प्रतितोळा पर्यंत घसरतील असे दावे करायला सुरुवात झाली. परिणामी गुंतवणूकदार हादरले आणि त्यांनी हातातले काम सोडून गुंतवणूक म्हणून बाळगलेले सोने बाजारात विकण्यास काढले. यात काही लालची लोकांनी धर्मपत्नीचे सौभाग्यलेणे सुद्धा विक्रीस काढल्याचे व्यापारी सांगतात. ही परिस्थिती अक्षरशः हातघाईची होती.
ज्या लोकांनी वरील कालावधीत सोने विक्रीस काढले, त्यावेळी ८० हजार रुपयांपर्यंत भाव घसरले होते. खरे म्हणजे सराफा व्यापाऱ्यांकडे रोकड नव्हती. तरीही लोकांनी व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून आठ दिवस ते महिनाभराच्या अंतराने सोने विक्रीचे पैसे घेतले. पण, पुढे सोन्याचे भाव कमी होण्याऐवजी वाढत गेले.
आता तर ते लाखाच्या पुढे गेले असून पक्कया व्यवहारातील सोन्याचे भाव सोमवारी १ लाख १ हजार ९६८ होते. नगदी व्यवहारात अजूनही ते ९९ हजार प्रतितोळा आहेत. सोन्याची सतत होणारी ही दरवाढ घाबरुन आठ ते दहा हजार रुपये कमी किमतीला सोने, दागिने विकणाऱ्यांच्या पश्चातापाला कारणीभूत ठरली आहे. नव्वदीतले सोने ८० च्या दराने विकले, त्याचा भाव आता लाखाच्या पुढे गेला अर्थात गुंतवणूकदारांचे किती नुकसान झाले असावे, याचा केवळ अंदाजाच करता येऊ शकतो.
सोन्याच्या दराबाबत अफवांचा जो बाजार उठला होता, त्या जेमतेम आठ तचे दहा दिवसांच्या कालावधीत नांदेडच्या सराफा बाजारात सुमारे २०० ते २५० किलो सोन्याची खरेदी-विक्री झाली. अर्थात ४०० काटींची उलाढाल झाल्याचे व्यापारी सांगतात. याशिवाय चांदीच्या बाबतीतही असेच चित्र होते.