

नायगाव : गोदावरी नदी दुथडी भरून वाहते असल्याने काठावरील उपनद्यांचे बॅकवॉटरने गावा गावात घरात, शेतात पाणी शिरले असून बरबडा, कुंटूर, सांगवी, इजतगाव, धनंज, राहेर, हुसा, मेळगाव, सातेगाव, वाडी, मनुर अशी गावातील शेती पुराच्या पाण्यात बुडाली आहे. शेतातील हिरवीगार पिके, शेतकऱ्यांच्या घामाच्या धारांनी उभी केलेली शेती, क्षणार्धात पाण्याच्या तडाख्यात वाहून गेली आहे.
शेतकरी जीवावर उदार होऊन धरणीला पडलेला आहे. एका बाजूला पिके वाहून गेल्याने संसार उद्ध्वस्त झाला, तर दुसऱ्या बाजूला मुक्या जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकला आहे. शासन म्हणतं आम्ही तयार आहोत, पण मदत कुठे आहे? गरीब शेतकऱ्याला आश्वासनं नकोत, तात्काळ मदत हवी. सरकार फक्त दौरे करून फोटो काढतं, घोषणांचा पाऊस पाडतं; पण आमच्या डोळ्यातलं पाणी कोण पुसणार?
भीषण वास्तव :
हजारो एकर शेती वाहून गेली
घरं आणि रस्ते पाण्याखाली
जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न
प्रशासनाकडून फक्त कागदावरच पुरनियंत्रण
राजकीय पुढाऱ्यांचे चमकदार दौरे सुरू आहेत. प्रशासनाचे अधिकारी कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहेत. पण शेतकऱ्यांचे संसार, पिके आणि आशा—सगळं वाहून गेलं आहे. गुरुवारी दिवसभर पडलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
शेतकऱ्यांच्या मागण्या
शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी
जनावरांसाठी चाऱ्याची सोय करावी
झालेल्या नुकसानीची त्वरीत पंचनामे करून भरपाई द्यावी
अन्यथा शेतकऱ्यांचा संताप उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.