

नागपूर – नागपूर शहरात एमडी (मेफेड्रॉन) सारख्या अमली पदार्थांची तस्करी दिवसेंदिवस वाढत चालली असून, यामध्ये आता महिलांचाही सहभाग दिसून येत आहे. जरीपटका परिसरात पोलिसांनी एका महिलेकडून घरातूनच एमडी विक्री होत असल्याचा पर्दाफाश करत ९० हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव प्रिती अनिल गजभिये (वय ४५, रा. लुंबिनीनगर, जरीपटका) असं आहे.
गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास गस्त घालत असलेल्या पोलीस पथकाला आरोपी प्रिती गजभिये हिच्या घरात एमडी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ धाड टाकून झडती घेतली, आणि स्वयंपाकघरात ठेवलेल्या एका डब्यात ९० हजार रुपये किमतीचे ४४.९३ ग्रॅम एमडी पावडर सापडले.
एमडी जप्त केल्यानंतर आरोपी प्रिती गजभिये हिला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत एमडी विक्रीसाठी ठेवले असल्याची कबुली तिने दिली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी तिच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी) आणि २१(ब) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक आयुक्त सत्यवान बांदीवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार अरुण क्षीरसागर, पीएसआय शशिकांत तायडे, आणि पोलिस कर्मचारी पंकज ठाकूर, तरंग शर्मा, प्रमोद, मंगेश, राहुल चौहान आणि नमिशा यांनी सहभाग घेतला.