

Fugitive Accused Arrested in Hyderabad
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत, भाग्यनगर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य फरारी आरोपीला थेट तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून जेरबंद केले आहे.
इलीयास ऊर्फ काला इलू इस्माईल खान (वय ३३, रा. टायरबोर्ड रोड, खुदबेनगर, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) (खून), १०९, ११८ (१), १८९(२), १९१(२), १९१ (३), १९० सह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. गुन्हा केल्यापासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी फरास आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती काढली. आरोपी हे हैदराबादमधील शमशाबाद मोहम्मद नगर परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने २० मे २०२६ रोजी हैदराबाद येथे सापळा रचून आर- ोपी इलीयास ऊर्फ काला इलू याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
या धडक कारवाईत एलसीबीचे अंमलदार राजीव बोधगीरे, गोविंद राठोड, साहेबराव कदम, विठ्ठल वैद्य, गणेश यादव, अकबर पठाण तसेच सायबर सेलचे राजू सिटीकर, दीपक ओढणे, महेश बडगु आणि रेशमा पठाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.