

Fraud worth ₹74 lakh in Nanded
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : अधिक परताव्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून सोने आणि ऑनलाइन स्वरूपात रक्कम जमा करून घेत तब्बल ७४ लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी देगलूर नाका परिसरातील 'रोझ ज्वेलर्स'च्या चार भागीदारांवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आला आहे.
या प्रकरणी मोहमद फैजल मोहमद ईजाज (वय ३० वर्षे, रा. अन्सार कॉलनी, देगलूर नाका, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३३६(२), ३३८, ६१ (२) सह एमपीआयडी कायदा कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खंडेराय हे करत आहेत.
हे आहेत आरोपी
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात १. आलिया जिशान अन्वर शेख, २. जिशान अन्वर शेख, ३. शेख आवेश अख्तर व ४. शेख जैद शेख आवेश अख्तर (सर्व रा. नांदेड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते २०२६ या कालावधीत देगलूर नाक्यावरील अन्सार कॉलनी येथील 'रोझ ज्वेलर्स मध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी आणि इतर साक्षीदारांना विश्वासात घेतले. त्यांच्याकडून सोने आणि ऑनलाईन स्वरूपात मोठी रक्कम स्वीकारली. त्यावर अधिक परतावा (मोबदला) देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट बँकेचे आदेश आणि बॉन्ड पेपरवर खोटे शिक्के मारून फिर्यादींना दिले. मात्र, मुदत संपल्यानंतरही कोणताही परतावा न देता एकूण ७४ लाख २४ हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केली.