

Forest Department action in Venkatapur, illegal teak worth Rs. 85 thousand seized
किनवट, पुढारी वृत्तसेवा : मौल्यवान वनसंपत्तीचा बेकायदेशीर साठा करून ठेवणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने आज सोमवारी (दि.०१) सकाळी दहाच्या सुमारास तालुक्यातील तेलंगणाच्या सीमारे-षेजवळील मौजे व्यंकटापूर येथे धडक कारवाई करत कट-साईज सागी लाकूड व गोल माल असा एकूण ४.१७३ घनमीटर लाकूड जप्त केले. या कारवाईत सापडलेल्या साठ्याची अंदाजित किंमत तब्बल ८५ हजार रुपये असून, आरोपी मिथुन धर्मा राठोड (वय ३१) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे अप्पारावपेठ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) उमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या घरासह गोठ्याची झडती घेतल्यावर ३६ नग कट-साईज सागी व ५ नग गोल माल असा लाकडाचा साठा उघडकीस आला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सागी तस्करीविरोधात वनविभागाचा हा मोठा धक्का मानला जात आहे.
या मोहिमेत इस्लापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धंनगे, वनपाल श्रीराम सज्जन, सय्यद वसीम, शेख काझी, खरात यांच्यासह वनरक्षक कडमपले, रघुनाथ वनवे, कृष्णा घायाळ, गीता डोंगरे, तसेच फिरत्या पथकातील वनरक्षक राठोड, झकडे आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईनंतर पुढील तपास सुरू असून, लाकूड तस्करीमागील मोठ्या रॅकेटचा माग काढण्यासाठी वनविभाग अधिक खबरदारी घेत असल्याची माहिती समोर आली आहे.