

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नवीन नांदेडमधील एमआयडीसी भागातील तिरुमला ऑईल मिल या कंपनीला आग लागल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत पाच जण गंभीररित्या भाजले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नवीन नांदेडमधील एमआयडीसीमध्ये कोत्तावार व बंडेचार या दोघांच्या भागिदारीत तिरुमला ऑईल मिल चालवल्या जाते. रविवारी सकाळी या ऑईल मिलवे काम पाहण्यासाठी या दोन्ही परिवारातील पाच जण दाखल झाले, मिलमध्ये काम करत असताना अचानक ऑईल मिलला आग लागली. या आगीच्या घटनेत सुधाकर सूर्यकांत बंडेवार (वय ६७), सुमीत सुधाकर बंडेवार (वय ३९), भास्कर प्रलााद कोतावार (वय ५०), हर्षद भास्कर कोतावार (वय २६), विनोद भास्कर कोत्तावार (वय २४) गंभीररित्या आगीमध्ये भाजले गेले. ऑईल मिलला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजेपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते.
अग्रिशमन पथकाचे प्रमुख के. एस. दासरे यांना घटनेची माहिती समजताच मोठ्या फौजफाट्धासह घटनास्थळ गाठत एमआयडीसी अग्रिशमन पथकाचा बंब व अन्य बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, नांदेड ग्रामीणचे पो. नि. ओमकांत चिचोलकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
आगीच्या घटनेची माहिती समजताच नवनिर्वाचित आमदार आनंद तिडके चोहारकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व आगीची पाहणी करत प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष विनय गिरडे, वैजनाथ देशमुख, उद्धव पा. शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
रविवारी तिरुमला ऑईल मिलला लागलेल्या आगीत कोत्ताबार कुटुंबातील तिघेजण तर बंडेवार कुटुंबातील दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळाली. पातील सुधाकर मंडेवार, सुमीत सुधाकर बंडेवार हर्षद कोत्तावार यांच्यावर शहरातील भगवती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत तर भास्कर प्रल्हाद कोत्तावार व विनोद भास्कर कोतावार यांच्यावर कौठा भागातील यशोसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.