

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मुरपार येथे सोमवारी (दि17) मध्यरात्री आगीचा थरार बघायला मिळाला. गोंदिया शहराच्या लगतच असलेल्या मुरपार या ठिकाणी ऑइल मिलला रात्री ०१ वाजता च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी मिल मध्ये कामावर असलेल्या ३५ मजूरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, मिल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरापासून काही किमी अंतरावर मुरपार हे गाव असून येथे जिमी गुप्ता यांच्या मालकीची ऑईल मिल आहे.
दरम्यान, मिलमध्ये धानाच्या कोंड्यापासून तेल काढण्याचं काम सुरू होते. त्यातच रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक मिलमध्ये आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. यावेळी ३५ मजूर कामावर होते. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून बंबांनी दहा तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर मिल मध्ये फसलेल्या सर्व ३५ मजूरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, या घटनेत मिल मालकाचे जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज असून घटनेची माहिती रावनवाडी पोलिसांना देण्यात आली आहे.