

...Finally, the administrative arrived in Karla village
नरेंद्र येरावार
उमरी : तालुक्यातील कारला गावात 'दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात' या मथळ्याखाली 'दै. पुढारी' ने वृत्त प्रकाशित करताच उमरी पंचायत समितीतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारला गावात भेट देऊन चौकशी केली पाहणी करून अर्धवट कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असून गावातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करून गावात सिमेंट रस्ते करण्यात आले. परंतु, रस्त्याच्या कडेला नालीचे बांधकाम केले नसल्याने गावातील घाण पाणी रस्त्याच्या कडेला साचून राहते. दुर्गंधीयुक्त पाण्याच्या शेजारीच पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे. नालीचे बांधकाम केले नसल्याने साचलेले घाणपाणी नळाद्वारे घरांना पुरवठा होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या संदर्भात 'दै. पुढारी ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाच्या दिली. अधिकारी गावात येत असल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने नाली स्वच्छ करण्यास सुरूवात केली. परंतु, नालीचे पक्के बांधकाम केले नसल्याने पून्हा तीच परिस्थिती निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, अर्धवट असलेल्या कामामुळे पुन्हा पावसाळ्यात नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने कायम स्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सरपंच एक आणि कारभारी दुसराच.....
कारला गावचे सरपंचपद महिलेसाठी राखीव आहे. परंतु, कारभारी मुलगा असल्याने कामात पारदर्शकता दिसून येत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असून याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, अधिकारी गावात आले, पाहणी केली आणि निघून गेले. मात्र विकासात्मक मूलभूत प्रश्न प्रलंबितच राहिले. हे मात्र विशेष.