

Farmers suffer losses of over Rs 1,500 crore due to heavy rains
नांदेड, पुढारी वृत्तसेवा यावर्षी पावसाळा ऑक्टोबर अखेरपर्यंत लांबला असला तरी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या दोन महिन्यात वारंवार अतिवृष्टी झाली व अनेक ठिकाणी पूर आले. यामुळे शेतजमीन व त्यावरील पिकांचे सुमारे सव्वा सहाशे कोटींचे नुकसान झाले. तर पावणे सहाशे कोटी रुपयांचे रस्ते व पूल वाहून गेले. जलसंपदा विभागाला सुद्धा सुमारे दीडशे कोटीचा फटका बसला.
लाक्षणिक अथर्थान यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. कारण पहिली अतिवृष्टी या महिन्यात नोंदवली गेली. त्यानंतर आवश्यक तसा पाऊस जून व जुलै महिन्यात पडला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा प्रवास चांगला होता. त्यामुळे पिकांची वाढसुद्धा जोमाने झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगल्या सुगीचे स्वप्नं पडू लागले; परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनापासून पावसाची लहर फिरली आणि अखंड संततधारेला सुरुवात झाली. १५ ते २० ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस व अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.
संपूर्ण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने अक्षरशः कहर केला. अनेकवेळा अनेक ठिकाणी ७५ मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने हातघाईची परिस्थिती निर्माण झाली. ऑगस्ट अखेरपर्यंत अनेक जलाशय भरले होते. सप्टेंबरच्या पावसाने नद्या, नाले व जलाशय ओसंडून वाहिले. पावसाची संततधार सुरूच होती. पावसात जोर सुद्धा जबरदस्त होता. त्यामुळे अनेक गावांत, शहरात पाणी शिरले. नांदेड सारख्या शहरात सुद्धा पावसाने हाहाकार माजवला, भर पावसाळ्यात गणेशोत्सव, नवरात्र सारखे सण पार पडले. गरजेपेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाल्याने तब्बल ५९२ कोटी रुपयांचे शेतपिकांचे नुकसान झाले. तर ४९ कोटी ४८ लक्ष रुपयांची मागणी शेतजमीन वाहून गेल्याने झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे करण्यात आली.
४ कोटी ३२ लाख रुपयांचे नुकसान शाळांच्या ईमारतींचे झाले. एवढेच नव्हे तर जलसंपदा विभागाचे सुद्धा १६८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. ७ कोटी ८९ लाख रुपयांचा फटका पाणीपुरवठा योजनांना बसला. गावोगावचे रस्ते व छोट्या नद्यांवरील पूल वाहून गेल्याने ते दुरुस्तीसाठी आता ५८२ कोटी ९४ लक्ष रुपयांची गरज भासते आहे. महावितरण कंपनीचे पोल उखडून पडणे, तारा तुटणे आदीचे नुकसान झाले असून ते दुरुस्तीसाठी ३ कोटी ६४ लाख रुपये लागणार आहेत.
मोठ्या शेतकऱ्यांचे नुकसान
दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ५९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय २ ते ३ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या बड्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकेसुद्धा वाहून गेली. त्यांचे ३६ कोटी २३ लक्ष रुपयांचे नुकसान झाले. आता मागील दोन दिवसांत थंडी पडू लागली असून पाऊस पडण्याची आशा जवळपास मावळली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव रबीच्या तयारीला युद्धपातळीवर लागले आहेत.