

Farmers are strongly opposing the Shaktipeeth Highway in many places.
गिरगाव, पुढारी वृत्तसेवा: हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमधून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गामुळे शेकडो हेक्टर जमीनीवर भूसंपादनाची कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी गिरगाव व उमरी शिवारातील जमिनीची मोजणी व भूसंपादन करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी घरात नाही पीठ तर कशाला हवा शक्तीपीठ अशा घोषणा देत मोजणी व भुसंपादनाला विरोध केला.
शक्तिपीठ महामार्गाच्या उभारणीमुळे अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर सुपीक जमीन या मार्गात जाणार असल्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा अनेक ठिकाणी कडाडून विरोध सुरू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरु होणारा हा महामार्ग तेथून नागपूरला जोडण्यासाठी मुंबई-नागपूर एक्स्प्रेसला जोडला जाणार आहे. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पत्रादेवीपर्यंत जाणार आहे.
तीन शक्तीपीठातून हा मार्ग जात असल्याने त्याला शक्तिपीठ महामार्ग नाव देण्यात आले आहे. जर शेतकऱ्यांच्या घरात खायला पिठच नसेल तर हा शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या काय कामाचा अशा प्रकारचा रोष आलेल्या अधिकारी यांच्याकडे शेतकर्यांनी व्यक्त केला. यावेळी शक्तीपीठ महामार्गात बाधित असलेल्या शेतकऱ्यांकडून मंडळ अधिकारी प्रियंका खडसे यांनी निवेदन स्वीकारले. कुरुंदा पोलिस स्टेशनचे रामदास निरदोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोणाचे तरी स्वप्न पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उद्धस्त करून कुटुंब रस्त्यावर आणण्याचे काम सरकारकडून केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. या महामार्गासाठी सरकारने मोबदला वाढवून दिला तरी हा शक्तीपीठ नको, अशा स्वरुपाची शेतकऱ्यांकडून मागणी सरकारकडे केली जात आहे.