

नांदेड, मुदखेड : भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले यांनी पक्षनेतृत्वाच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गोपनपल्ले यांनी त्यांच्या राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवले आहे. या राजीनामा नाट्यामुळे स्थानिक भाजपला मोठा धक्का बसला आहे. आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुदखेड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या परीने उमेदवारांच्या भेटीगाठी, मुलाखती पार पडल्या. यात निवडणुकीत प्रचंड बहुमताने नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी (पक्ष) प्रतिबद्ध २० वर्षानंतर मुदखेड नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवणारच असा आशावाद व्यक्त केला होता. पक्षनेत्यांनी राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी भाजपच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन केले आहे. परंतु, पक्षनेत्याने जिल्ह्यातील भाजपमध्ये एकाधिकारशाही सुरू केली आहे. गोविंद गोपनपल्ले असून, तब्बल भाजप सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे, मी ओबीसी नेता असून ओबीसी बैठका घेऊ नये असे कारण पुढे करून माझ्यावर दबाव आणला जात आहे.
पक्षनेते जिल्ह्यातील भाजप हुकूमशाहीने रिकामा करणार हे निश्चित आहे. तोंडावर आलेली नगरपरिषद निवडणूक, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका याच धर्तीवर राबविण्यात येणार आहेत. मी हाडाचा कार्यकर्ता असून पक्षवाढीसाठी तळमळीने काम करत होतो. आम्ही विरोधात राहून अंगावर केसेस (खटले) घेतल्या. पण कुणाच्याही सांगण्यावरून नेत्यांकडून मला जी वागणूक दिली, त्याची खदखद व्यक्त करीत, "अशा हुकूमशाही नेत्याच्या नेतृत्वाखाली मी काम करू शकत नाही," असे स्पष्ट मत गोपनपल्ले यांनी व्यक्त केले. भाजपच्या ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षांनीच भाजप सोडल्याने नेतृत्वावर विचार करण्याची वेळ आली आहे.
पदे व तिकिटेही मर्जीतील कार्यकर्त्यांनाच
नांदेड जिल्ह्यातील भाजपमध्ये पक्ष नेतृत्वाची एकाधिकारशाही सुरू असून, केवळ स्वतःच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पदे वाटप करणे, तिकिटे ही मर्जीतील कार्यकर्त्यांनाच वाटप करतील. भाजप सोडण्याचे मुख्य कारण मी ओबीसी नेता असून, ओबीसी बैठका घेऊ नये असे कारण पुढे करून माझ्यावर दबाव आणला जात आहे. पण मी स्वाभिमानी कार्यकर्ता असून माझ्यासारखे स्वाभिमानी कार्यकर्ते तालुक्याभरात भरपूर आहेत, असेही गोपनपल्ले म्हणाले.