

Linganakerur farmer death
देगलूर : तालुक्यातील लिंगणकेरूर येथे पिराजी चांदू दिंडे (वय ६०) या शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिराजी दिंडे हे नेहमीप्रमाणे आपल्या गाई-म्हशी घेऊन शेताकडे गेले होते. दुपारी म्हशी धुण्यासाठी तलावावर गेले असता, पाय घसरून ते खोल पाण्यात पडले. पोहता न आल्याने त्यांचा तलावातच बुडून मृत्यू झाला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. मात्र, अंधारामुळे मृतदेह तात्काळ सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. माजी पंचायत समिती सदस्य राजाराम कांबळे, सरपंच बालाजी कदम यांच्या माध्यमातून प्रशासनाला माहिती देण्यात आली. महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. देगलूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पिराजी दिंडे यांच्या पश्चात सुना व लहान नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या चार मुलांचे व पत्नीचे यापूर्वीच निधन झाले होते. ते सुना व नातवंडांसह राहत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दिंडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ५ ऑगस्ट रोजी गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.