

नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या आगामी विधानपरिषद निवडणुकीत नांदेडसह राज्यातील सर्व 17 मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खासदार अशोकराव चव्हाण, नांदेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्याशी मुंबईत झालेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.
निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या 17 मतदारसंघांपैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 11 मतदारसंघांमध्ये 18 जून रोजी मतदान, 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी राजूरकर यांनी निवडणुकीची तयारी, मतदार संपर्क मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील नेते, मतदारांकडून मिळणाऱ्या सहकार्याबाबत जाणून घेतले. राज्यातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.