

विशेष प्रतिनिधी
नांदेड : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत घराणेशाहीच्या नाण्यांचा खणखणाट समोर आलेला असताना नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणूकविषयक घडामोडींमध्येही तशीच स्थिती दिसत आहे. आमदारकी-खासदारकीचा तुरा डोक्यावर असताना त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला बँकेचे संचालकपदही राखायचे आहे.
नांदेड बँकेच्या संचालकांच्या २३ जागांसाठी तब्बल १६९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून बाद ठरविल्या गेलेल्या ११ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला येत्या सोमवारी होणार आहे. २३ पैकी किती जागा बिनविरोध निघतील, ते १६ जुलै रोजी स्पष्ट होईल. तत्पूर्वी वेगवेगळ्या पातळ्यांवर नेते आणि संबंधितांमध्ये खल सुरू आहे. काही जागांच्या पेचाच्या गाठी पक्क्या झाल्याचे दिसत असून त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खा.अजित गोपछडे आपल्या एक बंधूंसाठी, खा.रवींद्र चव्हाण नायगाव तालुक्याच्या जागेसह नातेसंबंधातील बेटमोगरेकर अशा दोन जागांसाठी, आ.राजेश पवार पत्नी पूनम यांच्यासाठी, माजी आमदार दिवंगत बापूसाहेब गोरठेकरांचे पुत्र स्वतःसाठी, आ.प्रताप पाटील चिखलीकर आपल्या कन्येसाठी, खतगावकर सूनबाईंसाठी, माजी आमदार माधवराव जवळगावकर व मोहन हंबर्डे तसेच विद्यमान आमदार भीमराव केराम व आ.तुषार राठोड हे स्वतःसाठी दावेदारी ठोकून उभे असल्यामुळे घराणेशाहीचा मोठा पट तयार झाला आहे. मोठ्यांच्या या झंझावातात काही माजी संचालकांसह नवख्या-नवोदितांची अवस्था दारुण आणि करुण झाली आहे. तथापि आतापर्यंत एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही.
मागील पाच वर्षांमध्ये या बँकेवर खा.अशोक चव्हाण यांच्या गटाचा वरचष्मा राहिला. २०२४मध्ये अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले, तरी बँकेतील बहुसंख्य संचालक त्यांच्या गटाचे म्हणूनच ओळखले गेले. आता चव्हाण यांना बँकेवर वरचष्मा राखायचा असून आपल्या गटाच्या जास्तीत जास्त जागा बिनविरोध याव्यात, यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गटांशी बोलणी केली; पण त्यातून अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. बँकेच्या २३ जागांपैकी ७ जागा जिल्हास्तरीय असून त्याठिकाणी मोठा पेच आहे. कोणाला बसवावे आणि कोणाला उभे करावे, हे अद्याप निश्चित होऊ शकलेले नाही.
आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित जवळपास १३ जणांना अर्ज भरावयास लावले. चव्हाण गटाशी तडजोड झाली, तर चिखलीकर सर्वप्रथम लोहा आणि कंधार या आपल्या हक्काच्या जागा सोडवून घेण्याच्या भूमिकेत आहेत, असे सांगण्यात येते; पण त्यांच्या इतर समर्थकांचे काय, याचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. चिखलीकर गटाच्या उमेदवारांची बैठक रविवारी होणार असल्याचे सांगण्यात आले.
दुसर्या बाजूला काही प्रमुखांनी आपला स्वतंत्र गट निर्माण करण्याची तयारी चालवली आहे. खा.अशोक चव्हाण यांनी शनिवारी दुपारी आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार बैठक घेतल्याचे दिसून आले; पण त्यातील तपशील कळाला नाही. चव्हाण व भास्करराव खतगावकर यांची प्राथमिक चर्चा झाल्याचे सांंगण्यात आले. खतगावकरांच्या स्नुषा डॉ.मीनल यांच्या बाबतीत खुद्द चव्हाण अनुकूल असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उतरले असले, तरी त्यातील अनेकांची आतापर्यंत कोणी साधी दखलही घेतलेली नाही असे दिसून आले.
कवळे गुरुजी ठाम!
उमरी आणि धर्माबाद तालुका सेवा सहकारी संस्था या दोन मतदारसंघांमधून मारोतराव कवळे यांनी एका जागेवर स्वतः तर दुसर्या जागेवर आपल्या पत्नीचा अर्ज दाखल केला आहे. त्यांचे विरोधक कैलास गोरठेकर यांनी खा.चव्हाण यांच्याकडे उमरीच्या जागेवर आपला दावा सांगितला आहे; पण कोणी काही म्हणो, उमरीची जागा कोणासाठी सोडण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून त्यांनी आपला ठामपणा अधोरेखित केला.