

Risks likely to increase due to incomplete and defective highway works
किनवट, पुढारी वृत्तसेवा :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ 'अ' अंतर्गत किनवट शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या अर्धवट व सदोष कामांमुळे भविष्यात अपघात, वाहतुकीचे अडथळे व नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असून, याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी सहायक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी अशोक स्तंभपरिसरात रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असताना 'कलवट' न बांधता काम सुरू असल्याचे निदर्शनास आणले. या भागात पावसाळ्यात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर होतो.
'कलवट' नसेल, तर पाणी रस्त्यावर साचून अपघात व आजार फैलावण्याचा धोका संभवतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोकुंदा शिव दरम्यान दुभाजक नसल्यामुळे वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गावर दुभाजक करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सुचवले आहे.
याशिवाय रस्त्याची रुंदी अनेक ठिकाणी असमान असून, काही भागात मोकळी जागा असूनही ती न वापरता रस्ता अरुंद ठेवण्यात आला आहे. यामुळे भविष्यात अतिक्रमणास प्रोत्साहन मिळू शकते. रस्त्याचे काम करताना समसमान रुंदीचा निकष ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली.
नाल्यांची स्थिती देखील अर्धवट व विसंगत असून, पावसाच्या वेळी योग्य निचऱ्याचा अभाव निर्माण होऊन पाणी रस्त्यावर साचण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरण, संबंधित ठेकेदार व विभागांशी समन्वय साधून हे काम योग्य पद्धतीने व तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी श्री. नेम्मानीवार यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.