

Do not give a political angle to Ajit Pawar's accident
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची डीजीसीएमार्फत चौकशी सुरू असून, या दुर्घटनेला राजकीय स्वरूप देणे चुकीचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. गुरुवारी (दि. ५) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. अजित गोपछडे, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. श्रीजया चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, विजय येवनकर, निलेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
अमोल मिटकरी व संजय राऊत यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित केलेल्या शंकांविषयी पत्रकारांनी विचारले असता खा. चव्हाण म्हणाले की, अशा प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी ठोस आधार आणि पुराव्यांची गरज असते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, अहवाल येण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोप करणे अयोग्य आहे.
अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद
यावेळी अर्थसंकल्पावर भाष्य करताना खा. चव्हाण म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प स्वागतार्ह असून यात महाराष्ट्रासाठी ९८ हजार ३०६ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या प्रगतीला नवी दिशा देणारा असून, यामुळे देशाची आर्थिक घोडदौड अधिक वेगवान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी मांडलेली संकल्पना यातून अधोरेखित झाली आहे.