

District Bank Election: Nomination forms to be accepted again starting today
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र विक्री आणि दाखल करून घेण्याची प्रक्रिया सोमवारपासून पुन्हा सुरु होणार आहे. तीन दिवसांच्या शासकीय सुट्ट्यांमुळे ही प्रक्रिया बंद होती. मंगळवारी शेवटची तारीख असल्यामुळे पुढील दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान शनिवारी काँग्रेसचे खा. रवींद्र चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर यांची संयुक्त बैठक पार पडल्याची माहिती आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. परंतु तीन दिवस सलग शासकीय सुट्टी आल्यामुळे नामनिर्देशनपत्रे दाखल होऊ शकले नाहीत. २५ जूनपर्यंत २९६ अर्जाची विक्री झाली होती. शिवाय केवळ दोन इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. विशेष म्हणजे एकाही राजकीय पक्षाच्या इच्छूक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नसल्यामुळे सोमवार आणि मंगळवारी या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा बँकेत मोठी लगबग पहावयास मिळणार आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक ठराव आल्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व सुत्रे हाती घेवून मोठी रणनिती आखली आहे. महाविकास आघाडीसह महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून निवडणूक बिनविरोध काढण्याच्याही हालचाली मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीतील घटक पक्ष आणि काँग्रेसच्या वाट्याला काही जागा सोडून ही निवडणूक बिनविरोध काढता येईल का, हा पर्याय चर्चेसाठी खुला ठेवण्यात आला आहे. तालुकास्तरावरील १६ जागांपैकी भाजपाकडे ९ जागा ठेवून उर्वरित ६ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसला विभागून देण्याचा पर्याय भाजपा नेत्यांच्या विचाराधीन असला तरी जिल्हास्तरावरील ७जागांसाठी मात्र इच्छूकांची संख्या वाढल्यास निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
शनिवारी खासदार अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे खा. रवींद्र चव्हाण यांच्यात चर्चा झाल्यानंतर शनिवारी पुन्हा चर्चेची दुसरी फेरी झाली. परंतु या बैठकीत खा. अशोक चव्हाण यांच्याऐवजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी भाजपातर्फे भूमिका मांडली. खा. रवींद्र चव्हाण, आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतल्याची माहिती आहे.
आ. राठोड ठाम, आ. पवारांचे मौन
मुखेडची जागा हाणमंत पाटील बेटमोगरेकर यांना न देण्यास आ. तुषार राठोड यांची भूमिका ठाम दिसत आहे. दुसरीकडे नायगावच्या जागेबाबत भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये मतैक्य झाले नसले तरी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. या जागेवरून आ. राजेश पवारांनी मात्र आपले मौन अद्याप सोडले नाही.