

Marathwada Devagiri Express Extension
नरेंद्र येरावार
उमरी : आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्याचा रेल्वे विभागावर पूर्वीपासून वरचष्मा राहिला आहे. आंध्र प्रदेशच्या राजधानीला हैदराबाद सिकंदराबादला जाण्यासाठी भरपूर रेल्वे गाड्या आहेत. परंतु महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्लीला जाण्यासाठी मोजक्याच रेल्वे गाड्या का?
मराठवाड्याची देवगिरी एक्सप्रेस लिंगमपल्लीपर्यंत वळवली मग रॉयलसीमा एक्सप्रेस नांदेड परभणी संभाजीनगर पर्यंत सोडण्यास का सापत्नभावाची वागणूक?असा सवाल करत रॉयलसीमा एक्सप्रेस मराठवाड्यापर्यंत सोडावी या मागणीसाठी झोपेत असलेल्या मराठवाड्यातील खासदारांना एसएमएसद्वारे जागे करण्याचे काम बालाजी भक्तांनी सुरू केले आहे.
महाराष्ट्र आणि विशेषता मराठवाड्यातील लाखो भाविक भक्तांचे तिरुपती बालाजी हे कुलदैवत आहे. त्यामुळे दररोज हजारो भाविक भक्त तिरुपतीला जातात. परंतु तिरुपतीला जाण्यासाठी रॉयलसीमा ही एकमेव रेल्वे गाडी निजामाबाद रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येते. त्यामुळे मराठवाड्यातील भाविकांना मोठी अडचण सहन करत निजामाबाद रेल्वे स्थानकावर जावे लागते. त्यामुळे भक्तांची मोठी गैरसोय होते. रॉयलसीमा एक्सप्रेस रेल्वे मराठवाड्यातील नांदेड परभणी संभाजीनगर पर्यंत सोडण्यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. काहीं खासदारांनी ही रेल्वे नांदेडला आणूच असे छाती ठोकून सांगितले होते. परंतु त्यांची घोषणा हवेतच विरली.
स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी आंदोलन करून मुंबईला जाण्यासाठी होणारा त्रास कमी करावा म्हणून स्वतःसाठी देवगिरी एक्सप्रेसला आरक्षण डबे वाढवून घेतले. परंतु सर्वसामान्य प्रवाशांच्या मागणीला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही ही शोकांतिका आहे.
रॉयलसीमा एक्सप्रेस नांदेड परभणी संभाजीनगर पर्यंत सोडविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत आहे. मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना देखील या भागातील लोकप्रतिनिधी विशेषतः खासदारांनी काहीच लक्ष दिले नाही. राॅयलसीमा एक्सप्रेस मराठवाड्यात आणण्यासाठी झोपेत असलेल्या खासदारांना जागे करण्यासाठी बालाजी भक्त व प्रवाशी एसएमएसद्वारे संदेश पाठवण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे परभणी जिल्हा भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवार यांनी सांगितले आहे.
नांदेड रेल्वे विभागातून दिल्ली आणि मुंबईला जाण्यासाठी मोजक्याच रेल्वे गाड्या आहेत. परंतु आंध्र आणि तेलंगणाची राजधानी असलेल्या सिकंदराबाद हैदराबाद ला जाण्यासाठी भरपूर गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या बाबीकडेही मराठवाड्यातील खासदारांनी सातत्याने दुर्लक्ष केले. मराठवाड्याची देवगिरी एक्सप्रेस लिंगमपल्लीपर्यंत सोडली परंतु रॉयल सीमा एक्सप्रेस मराठवाड्यात का नाही यासह रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे, बहुतांश पॅसेंजर रेल्वे गाड्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे, उमरी रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या बहुतांश एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात आला नाही असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.