

धर्माबाद : नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (धर्माबाद) यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबाद पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात धडक 'मास रेड' मोहीम राबवली. या कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दारूसाठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
अवैध दारू धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या या मोहिमेत पोलिसांनी एकूण ८,८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे:
पहिली कारवाई: १५० लिटर शिंदी दारू जप्त करण्यात आली, ज्याची अंदाजे किंमत ३,००० रुपये आहे.
दुसरी कारवाई: देशी दारूच्या (भिंगरी संत्रा १८० एम.एल.) एकूण ७३ बाटल्या जप्त केल्या, ज्याची किंमत ५,८४० रुपये आहे.
पोलीस निरीक्षक भडीकर यांच्या नेतृत्वाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक (WAPI) पगलवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक (WPSI) प्रियांका पवार, पोलीस हवालदार कुमरे, मुंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल होलगे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. "अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात धर्माबाद पोलीस ठाण्यामार्फत आगामी काळातही अशीच कठोर मोहीम राबवली जाईल," असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.