

नांदेड ः बिबट्यांसारख्या वन्यप्राण्यांचे हल्ले होण्याच्या घटना सतत होत असल्याच्या पार्श्वभूमिवर शेतीला रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.
सभागृहात मागणी केल्यानंतर याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या काळात ऊस, केळी, गहू, हरभरा, हळद सारख्या पिकांना पाणी देण्याची गरज असते. त्यासाठी पंप सुरु करायला शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. सध्या शेतीला शिफ्टमध्ये वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठ्याची वेळ रात्रीची असेल तर शेतकऱ्यांना नाईलाजाने रात्रीच्या अंधारात शेतात जावे लागते.
रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचे हल्ले होण्याची शक्यता जास्त असते. वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमिवर शेतीला दिवसाच्या काळातच सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यानुसार वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात आवश्यक त्या सुधारणा तात्काळ कराव्यात, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने केल्याचे आ. श्रीजया चव्हाण यांनी सांगितले.