Marathwada Congress News : मराठवाड्यातील काँग्रेस पक्ष विधान परिषदेतून हद्दपार!

केवळ अमित देशमुख हेच काँग्रेसचे एकमेव विधिमंडळातील सदस्य
MLC
MLC Pudhari Photo
Published on
Updated on

संजीव कुळकर्णी

नांदेड : ७८ सदस्यसंख्या असलेल्या राज्य विधान परिषदेत एकाचवेळी १७ नव्या सदस्यांची भर पडत असताना विधिमंडळाच्या या वरिष्ठ सभागृहातून मराठवाड्यातील काँग्रेस पक्ष अक्षरशः हद्दपार झाला आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. त्यापूर्वी विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या माध्यमातून १७ नवे सदस्य या वरच्या सभागृहात लवकरच दाखल होणार, हे स्पष्ट झाले. हे सर्वच्या सर्व सदस्य महायुतीचे असून भाजपा व अन्य मित्रपक्षांचे सभागृहातील बहुमत आता खणखणीत झाले आहे.

MLC
‌NCP funding issue : ‘राष्ट्रवादी‌’च्या अनेक नेत्यांनी पक्षाला दिलेली रक्कम बुडाली!

यानिमित्ताने मराठवाडा विभागाचा विचार करायचा झाला, तर राज्य स्थापनेनंतर प्रथमच असे चित्र निर्माण झाले आहे की, आठ जिल्ह्यांच्या या विभागातील काँग्रेस पक्षाचा एकही प्रतिनिधी आता विधान परिषदेमध्ये राहिलेला नाही. एकेकाळी मराठवाड्यात या मतदारसंघावर आपला वरचष्मा राखणाऱ्या काँग्रेस पक्षाला मराठवाड्यात चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केवळ लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघात उमेदवार देता आला. त्या उमेदवाराचाही दारुण पराभव झाला.

मागील काळात मराठवाड्यातून शंकरराव चव्हाण, पद्मश्री श्यामराव कदम, ईश्वरराव भोसीकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, रजनीताई सातव मग लातूरचे दिलीपराव देशमुख या दिग्गजांसह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी विधान परिषदेमध्ये स्थान प्राप्त केले.

राज्य विधानसमेत मराठवाड्यातून काँग्रेसतर्फे अमित देशमुख हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. काँग्रेसची अशी दयनीय अवस्था यापूर्वी कधीच नव्हती. गतवर्षाच्या अखेर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस पक्षाला सर्वच जिल्ह्यामध्ये मोठा दणका बसल्यामुळे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात या पक्षाला कोठेही यश मिळू शकले नाही.

२०२४ची लोकसभा निवडणूक झाल्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेतील काही जागांची निवडणूक जाहीर झाली तेव्हा काँग्रेसने आपल्या वाट्यास येणारी एकमेव जागा माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उदारपणे बहाल केली होती. पण या बाईंनी दीड वर्षांत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्या भाजपाकडून पुन्हा परिषदेमध्ये आल्या. मधल्या काळात जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे राजेश राठोड यांचीही मुदत संपली. आता विधान परिषदेवर मराठवाड्यातून काँग्रेसतर्फे कोणीही नाही.

MLC
Nanded legislative council election : वि.प.निवडणूक : महायुतीत नांदेडची जागा भाजपाला सुटल्यातच जमा!

काँग्रेसच्या मित्रपक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा मराठवाड्यातील एकही कार्यकर्ता विधान परिषदेमध्ये नाही. ठाकरे गटातर्फे अलीकडे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. महायुतीच्या विरोधातील पक्षांचे ते मराठवाड्यातील एकमेव प्रतिनिधी आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सतीश चव्हाण व विक्रम काळे हे दोघे विधान परिषदेत अनुक्रमे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

विधान परिषद सदस्यांच्या उपलब्ध झालेल्या यादीनुसार राज्य विधान परिषदेत आता काँग्रेसचे सतेज ऊर्फ बंटी पाटील (कोल्हापूर), अशोक ऊर्फ भाई जगताप, जयंत आसगावकर (पुणे) व धीरज लिंगाडे हे चारच सदस्य कार्यरत आहेत. या चौघांची मुदत २०२८-२९मध्ये संपणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news