

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी (Nanded Lok Sabha Bypolls) काँग्रेसने रविंद्र चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. रविंद्र चव्हाण हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. बुधवारी रात्री झालेल्या काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद चव्हाण हे एकच नाव एकमताने ठरल्याचे नाना पटोले यांनी सांगितले होते. त्यामुळे केवळ औपचारिक घोषणा शिल्लक होती.
२०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण नांदेड लोकसभेतून निवडून आले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. वसंतराव चव्हाण यांच्या ठिकाणी त्यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येईल, अशा चर्चा सुरुवातीपासून होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या छाननी समितीनेही एकच नाव एकमताने ठरवले होते. आज काँग्रेस पक्षाने याबद्दलची अधिकृत घोषणा केली. मात्र यानंतर भाजप ही जागा लढवणार का आणि लढवत असताना उमेदवार कोण देणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.
खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याने नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. या निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.