

Nanded Clearing the doubts of the common people through Janata Darbar
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी शहर व जिल्ह्याच्या अकरा ठिकाणी झालेल्या पोलीस जनता दरबारात अनेक सामान्य नागरिकांच्या समस्यांचे निरसन झाले. पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या पुढाकाराने आज हा उपक्रम राबविण्यात आला.
तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेला नांदेड जिल्हा राज्याच्या गृह दप्तरी अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला लगतच्या विदर्भाचीही सीमा आहे. जिल्ह्यात एकूण ३६ पोलीस ठाणे आहेत. मराठवाड्याच्या अन्य जिल्ह्याच्या तुलनेत (छत्रपती संभाजीनगर वगळून) येथे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे. नांदेडच्या रेल्वेस्थानकावरून दररोज १०० पेक्षा अधिक रेल्वेची वाहतूक होते. त्यामुळे शहर व परिसरात गुन्हे करून अन्य राज्यात पळून जाणा यांची संख्याही मोठी आहे. नवीन नवीन गुन्ह्याच्या पद्धती अवलंबिल्या जात असल्याने नवीन गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात सुसंवाद रहावा, पोलिसांप्रती विश्वासाचे नाते निर्माण व्हावे. सामान्य नागरिकांनी खंबीरपणे पोलिसांना गुन्हेगारांची माहिती द्यावी, पोलीस अधिक्षक अविनाशकुमार यांनी वेगवेगळ्या आठ उपाय योजना सुरू केल्या आहेत. ऑपरेशन फ्लश आऊट, निर्भया मिशन, दामिनी पथक तसेच महिला व मुलांच्या सुर क्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत.
आज याच उपक्रमांतर्गत नांदेड शहरातल्या सहा व ग्रामीण भागातील पाच पोलीस ठाण्यात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पोलीस उपअधीक्षकांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. स्वतः पोलीस अधिक्षक भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेत. अनेक प्रकरणातून मार्ग काढले. काही ठिकाणी रात्रीची गस्त होत नाही. मनुष्यबळाची वाणवा आहे. पोलीस सत्वर प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी करण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारी समजून घेत त्यावर उपाय योजना करण्याबाबत उपस्थितांना आश्वस्थ करण्यात आले.
जनता दरबार संपल्यानंतर सर्व ठिकाणी त्या त्या पोलीस स्टेशनातील अधिकारी व कर्मचा-यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. प्रलंबित गुन्हे तात्काळ निकाली काढून सामान्य नागरिकांशी जास्तीत जास्त सुसंवाद ठेवावा, अशा सूचना अधिका-यांना दिल्या.