

Citizens suffer due to low-height bridge at Marsangvi
अजीज मोमीन
जळकोट : अंत्यविधीला चाललात. सावधान! थांबा, विचार करा आणि मगच पुढे जा. अंत्यविधी जाणाऱ्यालाही मृत्यू गाठू शकतो. ही सत्य परिस्थिती आहे मरसांगवी (ता जळकोट) या गावची. तिरु नदीच्या काठावर बसलेले मरसांगवी हे गाव. मरसांगवी अतनूर रस्त्यावरील अत्यंत कमी उंचीच्या पुलाने अनेकदा अंत्यविधी रोखून धरला आहे. काही झाले तरी मर्यादित वेळेपेक्षा अधिक काळ मृतदेह अंत्यविधीविना घरात ठेवता येत नाही. त्यामुळे मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर ठेवूनच मरसांगवी येथील नागरिक आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होत आहेत.
मरसागवी हे जळकोट तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे डोंगराच्या कुशीत वसलेले व वृक्षवेलींनी नटलेले गाव आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे गाव असले तरी अनेक समस्यांचा सामनाही येथील गावकऱ्यांना करावा लागतो. अतिवृष्टी आणि पूर तर दरवर्षी येथील नागरिकांचे हाल हाल करून सोडतो. मरसांगवी येथे अतनूर जाणाऱ्या रस्त्यावर मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. गावातील मुस्लिम समाजातील एखादी व्यक्ती वारते आणि मोठा पाऊस होतो तेव्हा अंत्यविधी उरकण्याचा मोठा प्रश्न येथे भेडसावतो.
मरसांगवी ते अतनूर रस्त्यावरील छोटा पूल मृत व्यक्तीच्या अंत्यविधीला ताटकळत ठेवतो. ओढ्याला आलेला पूर ओसरेल आणि अंत्यविधी करता येईल असा विचार करीत असलेल्या आप्तेष्टांचे पावसापुढे काही एक चालत नाही. मृतदेह अंत्यविधीविना अनिश्चित वेळ-`साठी घरी ठेवणे म्हणजे त्या मृतदेहाची अब-हेलनाच ठरते. मृतदेह ट्रॅक्टरमध्ये घेऊन अंत्यविधीला आलेली मंडळी पुरातूनच अर्थातच कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्यविधीसाठी कब्रस्तानकडे जातात. कब्रस्तानकडे गेल्यानंतर परत येताना पुन्हा पाऊस पडला आणि पुलावरील पाणी वाढले तर परत येणेही मुश्किल होऊन जाते. मरसांगवी येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेतीही त्याच मार्गावर आहे.
त्यामुळे अचानक पूर आला तर शेतकऱ्यांना शेतातच अडकून पडावे लागते. मरसांगवीवासीयांच्या नरकयातना दूर करण्यासाठी मरसांगवी अतनूर रस्त्यावरील पुलाची उंची तातडीने वाढवावी अशी मागणी सरपंच पूजा रवी गोरखे, उपसरपंच शादल पटेल, माजी सरपंच ऐनोद्दिन शेख, युवा सेनेचे पदाधिकारी उमाकांत इमडे, अहमद पटेल, माजी चेअरमन मैनोद्दिन बिरादार, माजी सरपंच दाऊद बिरादार, माजी चेअरमन व्यंकटराव गव्हाणे, नवाज पटेल, ग्राम पंचायत सदस्य नदीम शेख, ग्रामपंचायत कर्मचारी सेनेचे जिल्हा सदस्य नजीर शेख, खदीर पटेल, हादी जाफर पटेल, माजी सरपंच विश्वनाथ वाघमारे आदींनी केली आहे. या कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात अतनूर परिसरातील अनेक गावांचा संपर्कही तुटत आहे. त्यामुळे लवकर पुलाची उंची वाढवावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा या भागातील त्रस्त नागरिकांकडून देण्यात आला आहे.
पावसाने अंत्यविधी रोखल्याचा प्रकार यावर्षीच घडलाय असे नाही. गेले अनेक पावसाळे हा प्रकार सुरू आहे. यावरून पुलाची उंची वाढविण्याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. पाठपुरावा केला जात आहे. परंतु, पुलावरून कोणीतरी वाहून जाईपर्यंत अथवा जीवितहानी होईपर्यंत दखल घ्यायची नाही यासाठी प्रशासन अडून बसले आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. अंत्यविधीला चाललोत की स्तःचा अंत पाहायला चाललोत हेच नागरिकांना कळत नाही. माझे मरण पाहिले म्या डोळा अशी म्हण येथे तंतोतंत लागू पडते.