

Chikhlikar's reputation is at stake in Loha.
अहमद शेख
लोहा, पुढारी वृत्तसेवा : लोहा नगरपालिका निवडणुकीच्या निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. नगरपालिका निवडणुकीत कोणाची सरशी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचले असून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत झाल्याने या ठिकाणी अटीतटीची निवडणूक झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दहा प्रभागांत २० नगरसेवक निवडले जाणार असून ही निवडणूक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपली शक्ती लावून या ठिकाणी निवडणूक लढवली. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे तत्कालीन तालुका अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन त्यांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी गळ्यात घातली. त्यामुळे ही निवडणूक अतितटीची बनली आहे.
भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांना भाजपाने निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांच्या मागे खासदार अशोकराव चव्हाण यांनी पूर्ण शक्ती लावून लोहा शहरात अनेक प्रभागात कॉर्नर बैठका घेऊन भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पंकजा मुंडे, खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह भाजप नेत्यांच्या या ठिकाणी मोठ्या सभा देखील झाल्या. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. लोहा पालिकेचा निवडणूक निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता जनसामान्यात दिसून येत आहे.
सत्तेवरून लागल्या आहेत पैजा
लोहा नगरपालिकेत २० नगरसेवक पदासाठी ५३ मेलवर दहा प्रभागात निवडणूक रिंगणात होते. तर नगराध्यक्ष पदासाठी भाजप व राष्ट्रवादी असे दोनच उमेदवार असल्याने या ठिकाणी निवडणूक चुरशीची झाली आहे. त्यामुळे पालिकेत कोणाची सत्ता येणार याच्याच पैजा लागल्या आहेत.