

Case Registered Against Two, Including an Extension Officer, for Demanding a Bribe of ₹25,000
नांदेड, पुढारी वृत्तसेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने' अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाचा दुसरा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुखेड पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्यासह त्याच्या एका सेवानिवृत्त सहकाऱ्यावर मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. अमोल राठोड (विस्तार अधिकारी, कृषी, पंचायत समिती मुखेड) आणि गणप तराव शिंदे (सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, रा. मुखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. तक्रारदाराच्या भावाच्या नावे मौजे कुंद्राळा येथील शेतात विशेष घटक योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली होती.
विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर सिमेंटचे कडे ाकण्यासाठीचा दुसरा हप्ता २ लाख ५ हजार रुपये मंजूर करून ते बँकेत जमा करण्यासाठी आरोपी अमोल राठोड याने सेवानिवृत्त अधिकारी गणपतराव शिंदे याच्यामार्फत २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पहिला हप्ता २० हजार व काम झाल्यावर ५ हजार रुपये देण्याचे ठरले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी पडताळणी केली असता लाचेची मागणी स्पष्ट झाली. मात्र, सापळा रचला असताना सेवानिवृत्त अधिकारी शिंदे याला तक्रारदाराचा संशय आल्याने, त्याने वारंवार जागा बदलून व नंतर फोन न उचलून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे टाळले. अखेर एसीबीने या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोनि. सुरेश बनसोडे यांनी केली असून, पुढील तपास पो. नि. अर्चना करपुडे करत आहेत.