

Loha Buddhist Protest
लोहा : लोहा शहरातील कंधार रोडवरील जायकवाडी वसाहत परिसरात नियोजित विश्वशांती बौद्ध विहाराच्या जागेवरील पंचशील धम्मध्वजाचा फलक आणि तारेचे कुंपण हटवून विटंबना केल्याचा आरोप करत सकल बौद्ध समाजाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात पाच हजारांहून अधिक बौद्ध अनुयायी सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
बसवेश्वर महाराज पुतळा ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने लोहा शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मागील २१ मे रोजी जायकवाडी वसाहतीतील पंचशील धम्मध्वज भूमाफियांनी हटवून त्याचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करून धम्मध्वज मूळ जागी सन्मानपूर्वक पुन्हा उभारावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा शाखेने दोन वेळा प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने बौद्ध समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर २३ जून रोजी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ढोल-ताशांच्या गजरात मोर्चाला सुरुवात झाली. मध्यवर्ती बसस्थानक मार्गे निघालेल्या मोर्चाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
मोर्चाचे नेतृत्व भदंत पय्याबोधी आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲड. अविनाश भोसीकर यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, रवी पंडित, नांदेड महापालिकेचे नगरसेवक प्रशांत इंगोले, राहुल सोनसळे, भीम टायगर सेनेचे प्रमुख दादासाहेब शेळके, रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे, रिपब्लिकन सेनेचे किरण धोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, प्रा. राज अटकोरे, अक्षय बनसोडे, ॲड. पंचशील कांबळे, ॲड. जयपाल ढवळे, गंगाधर महाबळे, साधना येंगडे, छगन हटकर, सपना खाडे, ज्योती सावळे, प्रशांत गोडबोले, माऊली गीते यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार परळीकर यांना निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, महेश मुळीक यांच्यासह विविध ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे दिवसभर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली.