

Kinwat Bodhadhi Sarpanch Election Balaji Bhise victory
किनवट : तालुक्यातील व्यापारी व महसुली दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण असलेल्या बोधडी (बु.) या ग्रामपंचायतीत नुकत्याच पार पडलेल्या नाट्यमय घडामोडींना मतदारांनी अखेरचा निकाल लावला. ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाने नाकारलेले सरपंच बालाजी भिसे यांना ग्रामस्थांनी थेट समर्थन दिले असून, 77 मतांच्या फरकाने त्यांनी विजयश्री खेचून आणली.
26 मे रोजी बोधडी ग्रामपंचायतीतील 17 ग्रामपंचायत सदस्यांपैकी मीना बानाटे, त्रिशला शेळके, अनसूया जमादार, संजीवनी थोरात, दैवशाला भिसे, अनिता मुंडे, राधा आमले, मंगल कोतवाल, सुलोचना दराडे, पानोजी तोरकड, संदीप सावंत, सुनील घुगे, संदीप लाखाडे, गणेश गवले, व माणिक पेंदोर या 14 सदस्यांनी विविध कारणांनी सरपंच भिसे यांच्याविरोधात तहसीलमध्ये अविश्वास ठराव दाखल केला होता. उर्वरित संजीवनी थोरात, शंकर खरोडे, नंदकुमार दराडे हे तीन सदस्य तटस्थ राहिले होते.
त्या पार्श्वभूमीवर 28 मे रोजी तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत 15 विरुद्ध 3 अशा स्पष्ट मतांनी अविश्वासाचा ठराव संमत झाला. मात्र, थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव अंतिम ठरण्यासाठी ग्रामसभेची मोहर आवश्यक होती. म्हणूनच सोमवारी (दि. 9 ) बोधडीच्या अंध विद्यालयात, तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या निगराणीखाली सरपंच अविश्वास ठरावावर ग्रामसभेची विशेष बैठक घेण्यात आली.
यावेळी झालेल्या गोपनीय मतदान प्रक्रियेत एकूण ६,३८१ मतदारांपैकी तब्बल ३,२४७ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात १,६०५ मतदारांनी सरपंच भिसे यांना पुन्हा सत्तेवर पाहण्याचा निर्णय दिला, तर १,५२८ मतदारांनी त्यांना नकार दिला. ११४ मते बाद ठरली.
या निकालानंतर गावात मोठा जल्लोष साजरा झाला. फटाक्यांची आतषबाजी, एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा झाला. विशेष म्हणजे, "सत्तेवर बसलेला आमचा नेता सदैव लोकांमध्ये वावरतो, काम करतो; म्हणूनच आमचा विश्वास त्याच्यावर होता," असे स्पष्ट मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
गावाच्या विकासासाठी पारदर्शकपणे, स्वच्छ निष्ठेने काम करत असल्यामुळेच गावकऱ्यांनी पुन्हा विश्वास दाखवला. सदस्यांना आपले हितसंबंध साधता आले नाहीत, म्हणून त्यांनी अविश्वास ठरावाचे शस्त्र उगारले. पण शेवटी खरे न्यायनिवाडे जनताच करते, अशा शब्दांत सरपंच बालाजी भिसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.