

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली. यापूर्वीच काँग्रेसने दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण नांदेडचे खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र काही महिन्यांनी त्यांचे निधन झाले.
त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी सोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. जबाबदारी अशोक चव्हाणांवर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील आहेत. भाजपने पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवताना अशोक चव्हाण यांचे मत विचारात घेतलेले आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी एक प्रकारे पक्षाने अशोक चव्हाण यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
काँग्रेसने या मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चव्हाण विरुद्ध हंबर्डे असा सामना पोटनिवडणुकीत रंगणार आहे.