

BJP flag hoisted at Shankarrao's house
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण नांदेडच्या शिवाजी नगर भागात प्रदीर्घ काळ ज्या घरामध्ये वास्तव्य केले, त्या घराचा त्यांच्या पश्चात मोठा विस्तार झाला. त्या घरावर भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भाजपाचा झेंडा लावण्यात आल्यानंतर समाज माध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
नांदेडच्या शिवाजीनगर भागातील या घराचे नामकरण आनंद निलयम असे करण्यात आले असून तेथे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व आता भाजपा खासदार असलेले शंकरराव यांचे पुत्र अशोक चव्हाण आणि त्यांच्या परिवाराचे वास्तव्य आहे.
६ एप्रिल तारीख म्हणजे भाजपाचा स्थापना दिन. यानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयाने सहा दिवसांचा कार्यक्रम आखला असून सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना पक्षाचा झेंडा लावण्याची सूचना दिली. त्यानुसार सोमवारी नांदेडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरावर झेंडे फडकले. खा. अशोक चव्हाण आणि त्यांच्या कन्या आ. श्रीजया चव्हाण यांनीही आपल्या घरावर भाजपाचा झेंडा फडकवला.
यानंतर खा. अशोक चव्हाण यांनी यासंबंधीचे छायाचित्र फेसबुक वरून पोस्ट करताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. स्वर्गीय शंकरराव चव्हाण योगदान आणि काँग्रेस पक्षाने दिलेल्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्यांची आठवण करून देत अनेकांनी खा. अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले. याव्यतिरिक्त नांदेड शहरात गेल्या तीन दिवसांत झालेल्या पाच हत्याकांडामुळे बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरूनही तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या.
यानंतर खा. अशोक चव्हाण यांनी भाजपा महानगर कार्यालयात भाजपाच्या झेंड्याचे ध्वजारोहण केले. यावेळी महानगराध्यक्ष अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, महापौर कविता मुळे, प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, विजय येवनकर, दत्ता पाटील कोकाटे यांसह भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा- खा. चव्हाण
भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयातील ध्वजारोहणानंतर उपस्थित सहकाऱ्यांशी खा. अशोक चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्र व पक्षवाढीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन उपस्थित भाजपा नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना केले.