

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, याच पक्षाचे केंद्रीयमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची स्मृती जपणारी नांदेडमधील भव्य वास्तू मागील दोन वर्षांमध्ये भाजपाच्या बैठका तसेच पक्षांतर्गत गोपनीय चर्चांसाठी सुरक्षित स्थळ झाली आहे. अलीकडच्या या प्रघातानुसार भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना शुक्रवारी सकाळी याच वास्तुमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. तेथील औपचारिक घडामोडींनंतर भाजपाच्या महापौर-उपमहापौरपदाच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले.
सकाळी 10.30च्या सुमारास या वास्तुतील सभागृहात भाजपा नगरसेवक व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक सुरू झाली. तत्पूर्वी खा.अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगरातील बंगल्यामध्ये काही घडामोडी झाल्या. चव्हाणांचे सहकारी डी.पी.सावंत सकाळीच या बंगल्यात गेले होते; पण नंतरच्या घडामोडींमध्ये तरोड्याचे ‘भाग्य’ आजच उजळणार याचा अंदाज कोणालाही आला नव्हता.
आधुनिक तसेच विकसित नांदेडमध्ये दोन्ही तरोडा गावांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. 1950च्या दशकात शंकरराव चव्हाण यांच्यानंतर नांदेडचे नगराध्यक्षपद भूषविलेले व्यंकटराव देशमुख तरोडेकर हे तरोडा (बु.)चे भूमिपुत्र; पण त्यांच्या आणि नंतरच्या काळात वरील दोन्ही गावे तत्कालीन नांदेड न.पा.हद्दीच्या बाहेरच होती. या शतकाच्या पहिल्या दशकात वरील दोन्ही गावांचा मनपामध्ये समावेश झाला. हा भाग आता एवढा विस्तारला की, दोन गावांतल्या वसाहतीतून नगरसेवकांच्या आठ जागा निर्माण झाल्या आहेत, तर शेजारच्या सांगवी भागातही चार जागा आहेत.
मनपा निवडणुकीत तरोडा गावांनी भाजपाच्या पदरात शतप्रतिशत यश टाकले नाही, तरी महापौरपदाच्या शर्यतीत या भागाने भाजपाला सर्वसाधारण प्रवर्गातून दोन महिला दिल्या. मागील 15 वर्षांत या भागातील नगरसेवकांपैकी कोणासही मनपाचे महापौरपद मिळाले नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा भाजपा नेत्यांच्या निदर्शनास आणून दिला गेला; पण त्याची नोंद घेतली जाईल का, ही शंका उपस्थित केली जात होती, तरी संतोष मुळे व किशन कल्याणकर हे दोघे आपापल्या ‘गृहमंत्र्यां’साठी स्वतंत्रपणे नेटाने प्रयत्न करत होते. खा.अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीयांतील काहींचा कल कल्याणकरांच्या बाजूने होता; पण दुसऱ्या बाजूला काही अदृश्य चेहरे मुळे यांच्यासाठी सक्रिय होते.
जि.प.च्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या महापौरपदी मराठा समाजातील महिलेला संधी दिली जावी, असा एक मतप्रवाह समोर आला. मराठा नसलेल्या एका नगरसेविकेचा पतीही या मताशी सहमत होता. मुळे आणि कल्याणकर या दोन्ही नगरसेविका वरील मतप्रवाहात बसणाऱ्या होत्या. त्याशिवाय वैशाली देशमुख हा एक पर्यायही भाजपाकडे होता; पण देशमुख-कल्याणकर यांच्या तुलनेत चव्हाण यांनी कविता मुळे यांना प्राधान्य का दिले, हे मराठा समाजातील अंतर्गत भेद ओळखणाऱ्यांच्या लक्षात आले असून मुळे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर ‘नोव्हेंबर फॅक्टर’ सरस ठरल्याचे सांगितले जात आहे.
नांदेडच्या स्थानिक नेत्यांनी महापौर-उपमहापौरपदासाठी मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांना गुरुवारी रात्री काही नावे कळविण्याची औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतरच्या पक्षांतर्गत घडामोडी बाहेर आल्या नाहीत; पण शुक्रवारी सकाळी भाजपा नगरसेवकांची बैठक सुरू झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांनी भाजपाचे शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांना पाठविलेले पत्रच उघड करण्यात आले. त्यात महापौरपदासाठी कविता संतोष मुळे तर उपमहापौरपदासाठी दीपकसिंह रावत यांच्या नावाला मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.
दोघांनाही सव्वा वर्ष...!
महापौर आणि उपमहापौर पदाचा कालावधी अडीच वर्षाचा असला, तरी मागील काळात काँग्रेसमध्ये राबविण्यात आलेला प्रयोग सुरू ठेवला जाणार आहे. त्यानुसार कविता मुळे आणि दीपकसिंह रावत यांना प्रत्येकी सव्वा वर्ष देण्यात आले असून उर्वरित कालावधीत अन्य दोघांना संधी दिली जाणार आहे.