

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमने महापौरपदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक अशोक हिवराळे यांना तर उपमहापौरपदासाठी वसीम अहेमद यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे 57 नगरसेवक असले तरी त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर इतर सर्व पक्षांनी एमआयएमला नव्हे तर अनुसूचित समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (दि. 6) पत्रकार परिषदेत केले.
महापौर-उपमहापौरपदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी आपापल्या गटांची नोंदणी केली. त्यासोबतच या पदासाठी उमेदवारांची घोषणा केली. यात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी देखील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली.
पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत. जो पक्ष भाजपसोबत असेल तो आमचा विरोधक आहे, असे ते म्हणाले. महापौरपदासाठी आम्ही अशोक हिवराळे यांना उमेदवारी दिली आहे. एमआयएमकडे संख्या बळ नाही. परंतु, भाजपविरोधात आम्ही उमेदवार उभा केला. आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचेच असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. महापालिकेत सफाईचे काम करणारे हिवराळे यांना साथ द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.