

Big decline in cotton production
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टी, दूषित वातावरण व विविध रोगांचा प्रादुर्भाव या विळख्यात अडकल्याने माहूर तालुक्यात कापसाच्या उत्पनात प्रचंड घट झाली असून हंगाम चांगला होईल, चार पैसे हातात खेळतील असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा जणू चुराडाच झाला आहे. त्यातच सिसीआयचे खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नाही. ही संधी साधून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांचे पांढरे सोने कवडीमोल भावात खरेदी करत आहेत.
ऑगस्ट महिन्यात माहर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने ऐन उमेदीच्या काळात कापसाची पाने पिवळी पडलीत, प्रचंड फुलगळ आणि बोन्डगळ झाली, त्यातच पावसासह जोराचा वारा सुटल्याने निम्याहून अधिक झाडं उधळलीत तसेच शेवटच्या टप्प्यात लाल्या पडला, ह्या बाबी कापसाच्या उत्पनात मोठी घट होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. दिवाळी सण असल्या कारणाने व गरजेच्या वेळी सिसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरुच न केल्याने कसाबसा हाती आलेला माल विक्रीसाठी काढला असता खाजगी व्यापारी मनमाने भावाने तो खरेदी करत आहेत, अशी शेतकऱ्यांची ओरड सुरु आहे.
माझे पापलवाडी शिवारात सव्र्व्हे नं.१५४ मध्ये ७ एकर शेत असून कापसावर दिड लाख रुपये इतका खर्च आला आणि उत्पन्न मात्र ६५ हजार रुपये एवढेच झाले, त्यामुळे काहीच सुचेनासे झाले आहे अशी व्यथा शिवा रामधन जाधव या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. *शासन सिसीआयचे केंद्र काय खासगी व्यापाऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठीच सुरु करणार काय असा संतप्त सवाल प्रगतीशील शेतकरी प्रशांत भोपी जहागीरदार यांनी उपस्थित केला आहे.