

नरेंद्र येरावार
उमरी, (जि. नांदेड) पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अस्थिर सरकार कै. आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांच्यामुळेच स्थिर झाले. त्यानंतर बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचाही सहवास लाभला. अशा गोरठेकर घराण्यातील शिरीष आणि कैलास गोरठेकर हे दोन बंधू असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद निश्चितपणे वाढणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमरी येथे केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष देशमुख गोरठेकर आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शनिवारी, (दि. २५) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या उमरी येथील मोंढा भागातील जाहीर सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, बाबासाहेब गोरठेकर व बापूसाहेब गोरठेकर यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार असून ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत नेण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली. लाडक्या बहिणी, दिव्यांग, श्रावणबाळ यासह शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. लाडक्या बहिणीनी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहनही केले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटून शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत घेणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री नवाब मलिक, माजी आ. मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर, सुधाकर देशमुख धानोरकर, भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, सुभाष देशमुख गोरठेकर, दिलीपराव धर्माधिकारी, नागनाथ घिसेवाड, राम पाटील याप्रसंगी माजी मंत्री नवाब मलिक, माजी आ. मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर, सुधाकर देशमुख धानोरकर, भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, सुभाष देशमुख गोरठेकर, दिलीपराव धर्माधिकारी, नागनाथ घिसेवाड, राम पाटील बनाळीकर, विष्णू पंडित, गणेश गाडे, सदाशिव पुपुलवाड, माजी नगराध्यक्ष प्रवीण सारडा, मोहम्मद रफीक मोहम्मद सज्जन, गणेश आनेमवार, नारायण यम्मेवार, नागेश बट्टेवाड, संतोष सोनकांबळे, राजेश्वर वंगलवार, शिवाजी पाटील कार्लेकर, प्रवीण पाटील चिखलीकर, भगवान मुदिराज, अनुसया कटकदवणे, बालाजी जाधव, आनंदराव यल्लमगोंडे, वैभव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ताब्यात...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण चालू असताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील सिंधीकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रीपत साळुंके दुगावकर यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, सोयाबीनला दहा हजार रुपयांचा भाव द्यावा, गोदावरी नदीवरील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शेतकरी संघटनेच्या त्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.