

नांदेड : नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये (शनिवार) सकाळी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७:४६ वाजता ३.३ रिश्टर स्केल आणि सकाळी ९:४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का नोंदवला गेला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये हे धक्के जाणवले. पहिला धक्का सौम्य असल्याने अनेक नागरिकांच्या ते लक्षात आले नाही, मात्र त्यानंतर बसलेला दुसरा धक्का अधिक तीव्र असल्याने घरातील भांडी आणि वस्तू हलल्या. यामुळे घाबरलेले नागरिक सुरक्षिततेसाठी तत्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जमा झाले. भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
दरम्यान, या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळाली असून जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचानक जमीन हादरल्याचे जाणवताच लोक भीतीपोटी अनेकजण घरांतून व इमारतींमधून मोकळ्या जागेत आणि रस्त्यावर पळाले. दरम्यान, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झालेली नाही.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, शेजारील हिंगोली जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यातच शनिवार दि. ३ रोजी सकाळी ७.४७ वाजता ३.३ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे.
नागरिकांनी घाबरू नये : पालकमंत्री सावे
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.