

भोकर : शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकरी दुग्ध व्यवसाय हा पर्याय ठेवतात. पण या दुग्ध व्यवसायात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. या व्यवसायाला चालना मिळावी व मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची यास जोड बसावी या अनुषंगाने भोकर येथील पंचायत समितीच्या सभागृहात ८ जुलै रोजी तालुक्यातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे.
मागील ४०-५० वर्षांपूर्वी गावातील प्रत्येकाच्या घरात जनावरे असायची. पूर्वी ज्या घरात 'गाई-गुरांचा' राबता तिथे लक्ष्मीचा 'वास' असे म्हटले जायायचे. पण आता गाई-गुरांचा राबता कमी होत आहे. सध्या दुधाची मागणी प्रचंड वाढली असली तरी गोठे मात्र रिकामे होऊ लागली आहेत तालुक्यातील मागील पाच वर्षांतील एकंदरीत परिस्थिती पाहता पाच हजार जनावरे कमी झाली असल्याचे पशु विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. ही एक धोक्याची घंटा समजली जात आहे.
दुग्ध व्यवसाय कमी झाल्याने हा पांढऱ्या दुधाचा काळा धंदा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या दुग्ध व्यवसायात वाढ व्हावी. नागरिकांना शुद्ध दुध मिळावे, दुग्ध व्यवसाय सोबतच शेळी पालन, कुक्कुटपालन या व्यवसायातून शेतकऱ्यांचा कणा ताठ रहावा व यास मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता ची जोड बसावी म्हणून ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता एकदिवसीय दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन चे प्रशिक्षक घेण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सखाराम खुणे, सहायक आयुक्त डॉ प्रवीणकुमार घुले, गटविकास अधिकारी माधव केंद्रे, सहाय्यक आयुक्त डॉ गौतम खिल्लारे, डॉ. रोहित धुमाळ, डॉ सतीश खिल्लारे हे मार्गदर्शन करणार आहेत.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अंतर्गत भोकर पंचायत समिती व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आज एकदिवसीय दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन चे प्रशिक्षक पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. या प्रशिक्षणात तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा लाभतालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावे.
- डॉ. अविनाश बुन्नावार पशुधन विकास अधिकारी, भोकर
दुग्ध व्यवसायला गती देण्यासाठी...
२०१८-१९ मध्ये झालेल्या विसाव्या पशुगणनामध्ये भोकर तालुक्यात २८ हजार २४९ गायवर्ग तर ७ हजार ८२३ म्हैसवर्ग होते. २०२४-२५ मध्ये झालेल्या एकविसाव्या पशुगणनामध्ये जनावरांच्या संख्येत घट झाली. पशुगणनामध्ये गायवर्ग २४ हजार १६४ तर म्हैसवर्ग ६ हजार ८४५ इतका आढळून आला. या पाच वर्षाच्या कालावधीत ५ हजार ६३ जनावरे कमी झाली आहेत. अशा प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी चालना मिळणार आहे