

Balasaheb Deshmukh's arms license will be canceled?
नांदेड : गणेश कस्तुरे
मध्यरात्री आ. बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर धुडगूस घालत पोलिसांवर हात उचलणाऱ्या माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख याचा शस्त्रपरवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
चार दिवसांपूर्वी माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख याने आ. बालाजी कल्याणकर यांचा मालेगाव रस्त्यावर असलेल्या कार्यालयासमोर मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा केला होता. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशमुख याने एका अधिकाऱ्याचेच कॉलर पकडण्याचे धाडस केले व पोलिसांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पक्षसंघटनेतील पदे व विशिष्ट जणांना मिळणारी कंत्राटे यामुळे देशमुख याचा राग अनावर झाला होता. यातूनच त्याने आ. कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर घातलेला धुडगूस अनेकांना खटकला.
पोलिसांनी देशमुख याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली. देशमुख याला जिल्हा प्रशासनातर्फे काही दिवसांपूर्वी शस्त्र परवाना देण्यात आला होता. ज्या दिवशी त्याने गोंधळ घातला, त्या दिवशी ते शस्त्र बेकायदेशीररीत्या वापरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्याकडून हे शस्त्र जप्त केले. कोणत्याही सबळ कारणाशिवाय त्याच्याकडे हा परवाना असल्याचे आता समोर आल्यानंतर भाग्यनगर पोलीसांनी हा शस्त्र परवाना रद्द करण्याची शिफारस केली आहे.
भाग्यनगर पोलिस ठाण्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस निरिक्षक संतोष तांबे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख व त्यांच्या पथकांनी गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोणत्याही परिथितीत गुन्हेगारांनी किंवा समाजकंटकांनी आपले डोके वर काढू नये यासाठी प्रयत्नरत असलेल्या भाग्यनगर पोलीसांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बळ मिळत आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्या तसेच पहाटे मॉर्निंग वॉकसाठी निघणाऱ्या वृद्धांना लुटणाऱ्यांचा बऱ्यापैकी बंदोबस्त झाल्याने अशा घटनात घट झाली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या शिफारशीनंतर बाळासाहेब देशमुख याचा शस्त्र परवाना रद्द करण्याच्या हालचालिंना वेग आला आहे. ज्या कोणाला कोणत्याही सबळ कारणाशिवाय शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. त्याचीही आता झाडाझडती सुरू असल्याचे सांगण्यात आले.