

नायगाव : 'खतरे में हिंदू नाही, मुसलमान नाही.. खतरे में तो शेतकरी आहे. जात-पात, पक्षीय भेद सोडा, कारण आपण सारे आधी शेतकरी आहोत. आपल्या न्यायहक्कासाठी एकत्र आलो, तर सरकार एका दिवसात कोसळेल, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच १५ दिवसांत खरेदी केंद्र सुरू करा, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घरात सोयाबीन आणून टाकू, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.
ते नायगाव तालुक्यातील बरबडा येथील शेतकरी–शेतमजूर हक्क एल्गार सभेत ते बोलत होते. भर पावसात झालेल्या सभेत या सभेत शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी सभेत भास्करराव धर्माधिकारी ,बल्लू जंजावळ, अमित ठाकूर, विठ्ठलराव देशमुख, पंढरीनाथ हुंडेकर, आनंद शिंदे यासह अनेक मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे माजी राज्यमंत्री कडू म्हणाले, देशात ७० टक्के जनता शेतकरी असूनही त्यांचा आवाज ऐकू येत नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांचे आवाज आकाशात घुमतात, ही खरी शोकांतिका आहे. सोयाबीनसाठी राज्य सरकारने ११,००० रुपये दर सुचविला, पण केंद्राने फक्त ८,००० रुपयेच घोषित केला. शेतकरी तीन हजार रुपयांनी लुटला जातोय. पंधरा दिवसांत खरेदी केंद्र सुरू झाले नाही तर पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात सोयाबीन आणून टाकू. तसेच कापसावरील आयातशुल्क कमी करून अमेरिकन कापूस भारतात ओतला जातोय. मे महिन्यात २५ लाख गाठी आल्या, डिसेंबरपर्यंत १५० लाख गाठी येतील. भारतीय शेतकरी उद्ध्वस्त होत असूनही आमदार-खासदार मुग गिळून गप्प आहेत, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.