

Attempt to sacrifice a young man for the sake of hidden treasure?
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
विज्ञानाच्या युगात देश प्रगत होत असला तरी, अंधश्रद्धेची कीड आजही समाजाला पोखरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भोकर तालुक्यातील बल्लाळ शिवारात गुप्तधनाच्या लालसेपोटी एका तरुणाला बळजबरीने अघोरी पूजा करण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत ५ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
भोकर तालुक्यातील बल्लाळ येथील एका शेतात गुप्तधन असल्याच्या अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला. मंगळवारी (दि. ४) रात्री आर-ोपींनी श्रीकांत बाजेकर या तरुणाला शेतात नेले. तिथे त्याला बळजबरीने कपडे काढायला लावून गळ्यात लिंबाची माळ घातली. त्यानंतर लिंबू, मिरची, हळद, कुंकू आणि नारळ अशा साहित्यासह अघोरी पूजा करण्यास भाग पाडले.
या प्रकाराने श्रीकांत प्रचंड घाबरला होता. दरम्यान, या अघोरी प्रकाराची चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली. श्रीकांतचा भाऊ सिद्धांत शेषेराव बाजेकर याने धीर धरत पोलिसांत धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पूजेचे साहित्य जप्त केले.
नरबळीचा प्रयत्न होता का?
गुप्तधनासाठी आजही अनेक ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार घडतात. बल्लाळ येथील घटनेत पीडित तरुणाला विवस्त्र करून, गळ्यात लिंबाची माळ घालून पूजा करायला लावल्याने, हा नरबळी देण्याचाच प्रयत्न होता का? अशी दाट शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस आता त्या दिशेनेही सखोल तपास करत आहेत.