

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः भाजपाचे संस्थापक अध्यक्ष, माजी पंतप्रधान-भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा महाराष्ट्रातील पहिला पूर्णाकृती पुतळा नांदेडमध्ये उभारण्याच्या भावनिक विषयात भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी आता पुढाकार घेतला असून पुतळ्याच्या नियोजित जागेसंदर्भात त्यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंतांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
1980 साली भाजपाची स्थापना झाल्यानंतर पुढील काळात पक्षाध्यक्ष या नात्याने वाजपेयी यांची नांदेडमध्ये जाहीर सभा ठेवण्यात आली होती. पण या सभेसाठी काँग्रेसच्या तत्कालीन स्थानिक नेत्यांनी सभेसाठी येथील स्टेडियमचे मैदान उपलब्ध करून दिले नव्हते. त्यामुळे ही सभा अन्यत्र घ्यावी लागली. हा गतइतिहास भाजपातील अनेकांना ठाऊक नाही; पण आता त्याच वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यात काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांनी आणि मनपातील पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
गेल्या जानेवारी महिन्यात नांदेड-वाघाळा मनपाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान भाजपाने आपला संकल्पनामा नांदेडकरांसमोर सादर केला होता. त्यात आगामी पाच वर्षांच्या काळात करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या बाबींचा उल्लेख करण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, समाजसेवक-भारतरत्न नानाजी देशमुख यांचे पुर्णाकृती पुतळे उभारण्याचा मनोदय पक्षाने जाहीर केला होता. निवडणुकीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौर-उपमहापौर व स्थायी समितीच्या सभापतीपदी याच पक्षाच्या नगरसेवकांची निवड झाली.
मनपाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख नगरसेवकांनी मांडला होता. तो बहुमताने मंजूर झाल्यानंतर वाजपेयींच्या पुतळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा शोध मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाला.
आता समोर आलेल्या माहितीनुसार नांदेडच्या दक्षिण भागात कौठा परिसरातील मामा चौकालगतची 20 गुंठे म्हणजेच सुमारे अर्धा एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी मनपातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र आणि प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या माहितीला मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी मंगळवारी दुजोरा दिला.
मनपा प्रशासनाकडून बांधकाम खात्याकडे पत्र रवाना झाल्याची माहिती मिळाल्यानंतर खा.चव्हाण यांनी मंगळवारी बांधकाम विभागाच्या स्थानिक मुख्य अभियंतांशी थेट संपर्क साधला. मनपाने मागणी केलेली जागा त्वरित हस्तांतरित व्हावी, यासाठी पुढील कार्यवाही लवकर करावी, असे चव्हाण यांनी मुख्य अभियंतांना सुचविले. वाजपेयी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या वर्षातच नांदेडमध्ये त्यांच्या पुतळ्याची उभारणी व्हावी, असा खा.चव्हाण यांचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.
खा.अशोक चव्हाण यांचे वडील व देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि अटल बिहारी हे केंद्रीय पातळीवरील दोन नेते मागील शतकात वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत होते, तरी दोघांचे व्यक्तिगत संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण राहिले. शंकररावांच्या एकंदर कार्यशैलीबद्दल वाजपेयी यांनी प्रशंसोद्गारही काढले हेोते.
नांदेडमध्ये शारदा भवन शिक्षण संस्थेच्या परिसरात शंकररावांचा पुर्णाकृती पुतळा 10 वर्षांपूर्वीच उभारण्यात आला आहे. त्यात अर्थातच अशोक चव्हाण यांचा पुढाकार होता. आता वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या विषयातही त्यांनी लक्ष घातले असून जागा ताब्यात मिळण्यापूर्वी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याचा मनोदय खा.चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला.
मनपा निवडणुकीदरम्यान भाजपाने आपल्या संकल्पनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, समाजसेवक नानाजी देशमुख यांचे पुतळे उभारण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्या टप्प्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या उभारणीचा विषय आम्ही मार्गी लावणार आहोत. त्यानंतर सावरकर व देशमुख यांच्या पुतळ्यासाठी योग्य जागा निवडून त्यांचेही पुतळे उभारण्यात येतील.
वीरेन्द्रसिंघ गाडीवाले, सभापती, स्थायी समिती मनपा नांदेड