

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, नायगाव, लोहा, उमरी व नांदेड तालुक्यातील गोदावरी घाटात वाळूमाफियांनी हैदोस घातला आहे. वाळूमाफियांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत असून त्यांची दहशत मोडीत काढली पाहिजे तसेच ज्या भागात अवैध वाळू उपसा सुरू आहे त्या भागातील तहसीलदार आणि पोलिस ठाणेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
मुदखेड तालुक्याच्या हरितपट्ट्यासहित जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गोदावरी घाटातून राजरोसपणे वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. हायवाच्या धडकेत जिल्ह्यात झालेल्या अपघातात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर मुदखेड शहरात नागरी मोर्चा निघूनही तालुक्यासहित जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा बंद झालेला नाही.
मुदखेड तालुक्यात कायमस्वरूपी वाळू उपशाला बंदी असताना खुजडा, वासरी, टाकळी, शंखतीर्थ, महाटी येथे वाळू उपसा सुरूच आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी शंखतीर्थ घाटावर भेट दिली असता, घाटावरून महाकाय बोटी वासरी घाटावर पसारही झाल्या. हीच परिस्थिती उमरी व लोहा तालुक्यातील गोदावरी घाटावरही असून वारेमाप वाळू उपशाने गोदावरीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. खा. अशोक चव्हाण यांच्या सूचक वक्तव्यानंतर मुदखेड, उमरी आणि लोहा तालुक्यातील वाळूमाफियांच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळल्या जातील का? हेच आता पाहावे लागेल.
मुदखेड तालुक्यात तर वाळूमाफियांचे सिंडीकेट असल्याचे बोलले जाते. त्यामुळे येथील वाळूमाफियांचे अर्थपूर्ण संबंधावर मोठ्या चर्चा सुरू असतात. हरितपट्ट्यातील शंखतीर्थ, वासरी येथून पुन्हा वाळू उपसा झाल्यास महसूल कर्मचाऱ्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता शंखतीर्थ येथून वाळू उपसा बंद झाला असला तरीही वासरी, महाटी, खुजडा येथून मात्र छुप्या पद्धतीने वाळू उपसा सुरूच असल्याने कोणकोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खा. अशोक चव्हाण यांनी वरील व्यक्त केल्याने वाळूमाफियांना संरक्षण देणाऱ्या तहसीलदार आणि पोलिस ठाणेदारांचे धाबे चांगलेच दाणाणले आहे. सोमवारी शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेप्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील वाळूमाफियांची गुंडगिरी मोडीत काढण्याची विनंतीही जिल्हा प्रशासनास केली आहे.