

नायगाव बाजार : नायगाव तालुक्यात शासनाने अद्याप एकाही वाळू घाटाला अधिकृत परवानगी दिलेली नसताना अंतरगाव येथील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाने संपूर्ण प्रशासनालाच नागरिकांनी धारेवर धरले आहे. रात्रीच्या अंधारात बोटींच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळू उपसा करून ती हायवा व टिपर वाहनांद्वारे तालुक्यातील विविध भागात विक्रीसाठी पाठवली जात असल्याने महसूल व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, दररोज रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू काढण्याचा ‘सिलसिला’ सुरू असतो. दहा ते पंधरा हायवा व टिपर वाहनांद्वारे ही वाळू खुलेआम वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कुंटूर येथे नव्याने पदभार घेतलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
“शासनाचा एकही वाळू धक्का सुरू नाही, मग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. अवैध वाळू माफियांना प्रशासनाचे अभय मिळत असल्याची चर्चा गावागावांत रंगू लागली असून महसूल व पोलिस विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
गोदावरी नदीपात्रातील अनियंत्रित वाळू उपशामुळे नदीची नैसर्गिक रचना धोक्यात आली असून भविष्यात पूल, रस्ते, बंधारे तसेच शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना प्रशासन मात्र ‘मूकदर्शक’ असल्याची तीव्र भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन अंतरगाव येथील अवैध वाळू उपसा त्वरित बंद करावा, संबंधित वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी तसेच महसूल व पोलिस विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.