

Anna Bhau Sathe Sahitya Samelan on Sunday in Nanded
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीच्या वतीने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रविवारी (दि.१२) साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन लोकाभिमुख व्हावे यासाठी संयोजन समितीतर्फे नियोजन सुरू असल्याची माहिती स्वागताध्यक्ष मारोती वाडेकर यांनी शुक्रवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला निमंत्रक गणेश तादलापूरकर, गंगाधर कावडे, गुणवंत काळे, महाव्यवस्थापक नामदेव कांबळे, कार्यवाह यशपाल गवाले आदी उपस्थित होते. साहित्य संमेलनाची सुरुवात अण्णा भाऊ साठे चौकातून ग्रंथ दिंडीने होणार आहे.
त्यानंतर आर्टीच्या विविध योजनांसह अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर व्याख्याने, चर्चासत्र, कविसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील. अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी बार्टी संस्थेच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ११ जुलै २०२४ रोजी स्थापन केली आहे.
आर्टीच्या योजनांचा लाभ अनुसूचित जाती अंतर्गत मांतग व तत्सम जाती (मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा) या समाजाला व्हावा या हेतूने, राज्यभर साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आ लेले असून, नांदेडमध्ये पहिले साहित्य संमेलन होत असल्याचेही स्वागताध्यक्ष तथा सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक मारोती वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. यावेळी खा. अशोक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, संजय सिरसाट, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. दशरथ इवतवार, खा. अजित गोपछडे, खा. प्रा. रवींद्र चव्हाण, माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, अंकुशराव कदम, प्रा. संजय गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी यांची यांची प्रमुख उपस्थिती असेल.
असे होतील कार्यक्रम
साहित्य संमेलनात मुंबई येथील इंदिरा आस्वार, जालना येथील प्रा. डॉ. दिलीप अर्जुने, नांदेडचे केशव शेकापूरकर हे मार्गदर्शन करणार असून, निमंत्रितांचे कविसंमेलनही होणार आहे. पुणे येथील धनंजय खुडे आणि संचाचा गाथा लोकशाहिरांची या सांस्कृतिक कार्यक्रमाने साहित्य संमेलनाचा समारोप होईल.