

Accelerating drought relief work in Nanded;
12 thousand laborers on the works of Rohyo!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना हक्काचा रोजगार देणाऱ्या व्हीबीजी-रामजी (विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण) योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात कामांनी मोठा वेग घेतला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ६४७६ कामे सुरू असून त्यावर १२११३ मजूर काम करत आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असून, मजुरांच्या हाताला काम मिळत आहे.
ही योजना पूर्वीच्या मनरेगा योजनेच्या जागी १ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेत पूर्वीच्या १०० दिवसांऐवजी आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला १२५ दिवसांचा रोजगाराची कायदेशीर हमी देण्यात आली आहे. काम मागितल्यापासून १५ दिवसांत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूदही या कायद्यात आहे. तसेच मजुरी वेळेवर न मिळाल्यास नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था आहे.
१६ नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ही कामे सुरू आहेत. यामध्ये जलसंधारण, नाला खोलीकरण, शेततळे, पाझर तलाव दुरुस्ती, घरकुल, शौचालय, सिंचन विहीर आणि पाणलोट क्षेत्रातील कामांचा समावेश आहे. ही कामे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नियोजन करून केली जात आहेत. त्यामुळे गावातच टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मजुरांची उपस्थिती, ई-केवायसी आणि मस्टर यांची नियमित तपासणी केली जात आहे. मजुरी थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. महिलांचा सहभागही या योजनेत लक्षणीय असून, अनेक ठिकाणी महिला मजूर मोठ्या संख्येने कामावर आहेत.
रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत नांदेड जिल्ह्याच्या कामाचे समाधान व्यक्त केले होते. कामांची संख्या आणखी वाढवून एकही पात्र व्यक्ती रोजगारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दुष्काळी परिस्थिती, शेतीवरील अवलंबित्व आणि स्थलांतर रोखण्यासाठी ही योजना नांदेडसाठी वरदान ठरत आहे. शेतीची कामे संपल्यानंतर गावातील मजुरांना गावातच रोजगार मिळत असल्याने स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील काळात जिल्ह्यात आणखी नवीन कामे मंजूर करून मजुरांची संख्या वाढवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. ज्या मजुरांकडे अजून जॉब कार्ड नाही, त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीत अर्ज करून कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दोन तरुण मजुरांचा मृत्यू !
हाताला काम मिळवण्यासाठी तेलंगणातील आदिलाबाद येथे कापूस वेचण्यासाठी निघालेले दोन मजूर धावत्या डेमो रेल्वेतून खाली पडून जागीच ठार झाल्याची घटना गुरूवार (दि. १२) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मदनापूर रेल्वे स्टेशनजवळ घडली. हदगाव तालुक्यातील नावा येथील विश्वंभर शंकर देशमुखे (वय ३५) व बंडू धोंडिबा देशमुखे (वय ३५) हे दोघे दिवाळी संपल्यानंतर आदिलाबादकडे जात होते. गाडीत प्रचंड गर्दी असल्याने ते दोघे रेल्वेच्या दरवाजात उभे होते. खचाखच गर्दीमुळे पाय ठेवायलाही जागा नसल्याने ते धावत्या गाडीतून खाली पडले आणि रेल्वेने चिरडले गेले. त्यांना तातडीने किनवट रेल्वे स्थानकावर आणून दुपारी १:२० वाजता गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कामावर असलेले मजूर
अर्धापूर-२१५, भोकर-३८५, बिलोली-८२५, देगलूर-५१०, धर्माबाद-७६, हदगाव-१७३५, हि. नगर-५९९, कंधार-२५००, किनवट-११८५, लोहा-९२६, माहूर-८१, मुदखेड-६६२, मुखेड-६२०, नायगाव-२२२, नांदेड-३३७, उमरी-५३५ असे १२११३ मजूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कामावर आहेत.