नांदेड : मुदखेड पोलीस ठाण्यात २०१० पासून दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार घोषित केलेल्या अट्टल आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. शेख इरफान उर्फ बंबय्या शेख साजिद (वय ३६, रा. निजामाबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो तब्बल १६ वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभरोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. २६ ऑगस्ट रोजी एलसीबीचे पथक नांदेड शहरात गस्तीवर असताना, मुदखेड येथील दरोड्याच्या तयारीत असल्याच्या गुन्ह्यातील (गु.र.नं. ५३/२०१०) फरार आरोपी शेख इरफान हा खुदबेनगर चौकात थांबल्याची बातमी गोपनीय बातमीदाराकडून मिळाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे व त्यांच्या पथकाने तातडीने खुदबेनगर चौक परिसरात सापळा रचला. एका पानटपरी जवळ पोलिसांची गाडी दिसताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शेख इरफान असल्याचे सांगताच पोलिसांनी त्याला मुदखेड पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही धडक कारवाई एलसीबी पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोविंद खैरे, पोलीस अंमलदार विक्की कालरा, ब्रम्हानंद लामतुरे, राजकुमार डोंगरे, उमर शेख, महेश बडगु आणि महिला अंमलदार अन्नुबी शेख यांच्या पथकाने पार पाडली.
अनेक गंभीर गुन्ह्यांत वॉरंट प्रलंबित
अटक केलेला आरोपी केवळ एकाच गुन्ह्यात नव्हे, तर वजिराबाद आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यातील जबरी चोरी, घरफोडी आणि दरोड्याच्या चार गंभीर गुन्ह्यांमध्ये नॉन-बेलेबल वॉरंट असलेला प्रलंबित आरोपी निघाला.