

A rickshaw driver who molested a minor girl has been arrested.
किनवट, पुढारी वृत्तसेवा: शेजारीच राहणाऱ्या एका २५ वर्षीय रिक्षाचालकाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात ओढून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना किनवट येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी किनवट पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी आणि आरोपी रिक्षाचालक हे शेजारीच राहतात. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आरोपी तरुण पीडितेची छेड काढत होता. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपीने पीडितेचा हात पकडला आणि "मला तुझ्याशी बोलायचे आहे, " असे म्हणत तिला मोबाईल देण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडितेचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
गुरुवारी (दि. १) पीडितेने पालकांसह किनवट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपी विरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपीला किनवट न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले आहेत.