

A person who Funeral 634 bodies
उमरी, पुढारी वृत्तसेवा: जिवंत असताना प्रत्येक माणसाचा सन्मान होतो. परंतु, मरणानंतरही त्याला सन्मान मिळावा याचसाठी तो गरीब असो की श्रीमंत, लहान असो की मोठा, विवाहित असो की अबिबाहित, ओळखीचा असो की अनोळखी, पुरुष असो की स्त्री, बालक असो की वयोवृद्ध असा कुठलाही भेदभाव न करता, अशा एकूण ६३४ जणांवर नांदेड येथील गणेश श्रीरामराव गादेवार यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
विशेष म्हणजे, आर्य वैश्य समाजातील रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे कार्य करीत ते अविरत करत आहेत. अंत्यसंस्काराला लागणारे लाकूड, कपडा व इतर सर्व साहित्य पुरविण्याची जबाबदारी घेतात. कोरोना काळात भयावह परिस्थितीतही १४ जणांचे अंत्यसंस्कार त्यांनी केलेत. काही वयोवृद्ध महिला व पुरुष हे नैसर्गिक मृत्यू पावले तर काही अपघातात मृत्यू पावले. अशा सर्वांचे अंत्यसंस्कार करून तिसऱ्या दिवशीचा अस्थी विसर्जनाचा विधी पूर्ण करण्याचे कार्यही ते करीत आहेत.
प्रारंभी मरण पावलेल्या व्यक्तीचे दर्शन घेऊन ही सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी शक्ती प्रदान करा, अशी प्रार्थना करून या कामाला सुरुवात केली जाते. लहान मुलांचा अंत्यसंस्कार विधी वेगळा असतो. विवाहित व्यक्तीचा विधी आणि अविवाहित व्यक्तींचा विधी वेगवेगळा असतो.
त्याचप्रमाणे बालमृत्यू, विधवा, सौभाग्यवतीचा अंत्यसंस्कार विधी देखील वेगवेगळा असतो. काही वेळा अग्री कोण द्यावा हा प्रश्न निर्माण होतो. महिला असो की पुरुष त्यांना लागलेल्या वेळेनुसार त्रिपाद, पंचक विधी करावा लागती. काही जणांना मुलं बाळ नसतात. तेव्हा त्यांचा विधी करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागतो. अशा परिस्थितीत अग्नी देण्यासाठी कोणी समोर आले नाही तर काही जणांचा अंत्यसंस्कार विधीही स्वतः गणेश गादेवार करतात.
प्रारंभी रात्रभर जागरण करून भजनी मंडळी उपलब्ध करून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी काही जणांचे डोळे उघडे असतात. अशावेळी कुटुंबातील व्यक्तीही घाबरतात. परंतु, तशाही परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्याचे धाडस त्यांनी स्वीकारले आहे. काही खूप गरीब असतात. त्यांच्याकडे अंत्यसंस्कार करण्याएवढेही पैसे नसतात. तेव्हा काही दानशूर व्यक्तींकडून मदत घेऊन त्यात स्वतःचेही पैसे टाकून अंत्यसंस्कार ते करतात.